वाशिम : पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण असलेला १३ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्यास आता ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.तेराव्या वित्त आयोगांतर्गत पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशा तिन्ही स्तरासाठी जनरल बेसिक ग्रँट, जनरल परफॉर्मन्स ग्रँट, स्पेशल एरिया बेसिक ग्रँट व स्पेशल एरिया परफॉर्मन्स ग्रँटच्या स्वरूपात ग्रामविकास विभागातर्फे कोट्यवधींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.हा निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१७ अशी होती. विविध कारणांमुळे राज्यातील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना तेराव्या वित्त आयोगातील हा निधी खर्च करता आला नाही. त्यामुळे अखर्चित निधी शासनाकडे परत जाण्याची भीती वर्तविली जात होती. या अखर्चित निधीला मुदतवाढ देण्याची मागणी वारंवार झाली. याची दखल घेत ग्रामविकास विभागाने २६ एप्रिल रोजी तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत अखर्चित निधी खर्च करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. शासन निर्णयातील तरतुदीनुसार अखर्चित निधी तातडीने १०० टक्के खर्च करण्याची दक्षता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी अटही ग्रामविकास विभागाने टाकली आहे. संपूर्ण निधी खर्च झाल्याचा अहवाल व उपयोगीता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याचे निर्देशही ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. तेराव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीस खर्च करण्यासाठी ३१ मार्च २०१८ अशी मुदतवाढ मिळाल्याबाबतच्या शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचा तेराव्या वित्त आयोगातील अखर्चित निधी खर्च करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या जातील.- हर्षदा देशमुख, अध्यक्ष ,जिल्हा परिषद वाशिम.
तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्यास मुदतवाढ!
By admin | Published: April 28, 2017 1:29 AM