वाशिम : गोरगरीब आणि गरजू व्यक्तींची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. याअंतर्गत जिल्ह्यात शिवभोजन थाळी वितरणाचे २७ केंद्र सुरू आहे. संबंधितांनी शासनाने ठरवून दिल्यानुसार त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकास मोफत जेवण उपलब्ध करून दिले; मात्र प्रशासकीय गलथानपणामुळे तीन ते चार महिन्यांपासून प्रती थाळी ५० रुपयांप्रमाणे मिळणारे लाखो रुपयांचे अनुदान प्रलंबित असल्याने केंद्र चालक आर्थिक संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यात सध्या २७ शिवभोजन थाळी केंद्र कार्यान्वित असून शहरात ही संख्या नऊ आहे. प्रत्येक थाळीमागे सरकारकडून केंद्र संचालकांना ५० रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, दिवसाला १५० थाळींचा हिशेब लावल्यास प्रतिदिवसाचे ७५०० रुपये; तर महिन्याकाठी २ लाख २५ हजार रुपये एका केंद्राचे देयक होते. अनुदानाची ही रक्कम दर १५ दिवसांनी अदा करणे बंधनकारक करण्यात आली आहे. असे असताना गत तीन ते चार महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवरून अनुदानाची रक्कमच न मिळाल्याने केंद्रचालक पुरते हैराण झाले आहेत. त्यातील काही केंद्र याच कारणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असून प्रशासकीय गलथानपणाप्रति सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.
...................
सर्वसामान्य केंद्रचालक खर्च कसा भागविणार?
शिवभोजन थाळी केंद्रातून दैनंदिन १५० थाळी पुरविण्याची परवानगी आहे. त्यापोटी मिळणारे अनुदान केंद्र चालकांना गत चार ते पाच महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे भाजीपाला, किराणा साहित्य, गॅस, कामगारांची मजुरी, वीज देयक, दुकानभाड्याची तजवीज करताना केंद्र चालकांच्या नाकीनऊ येत आहे. प्रशासनाकडून पैसेच मिळत नसल्याने हा खर्च कसा भागविणार, असा सवाल केंद्र चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
................
केंद्रचालक होताहेत कर्जबाजारी
शिवभोजन थाळी योजनेमुळे गोरगरिबांची उपासमार टळली आहे; मात्र प्रशासकीय पातळीवरून देयके मिळत नसल्याने त्यांना जेऊ घालण्याकरिता केंद्र चालकांना कर्ज घेऊन खर्च भागवावा लागत आहे. प्रशासनाने दखल घेऊन शिवभोजन थाळी योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रलंबित देयके त्वरित अदा करावी, अशी मागणी होत आहे.
....................
दर १५ दिवसांनी देयक अदा करणे बंधनकारक
शिवभोजन थाळी योजनेंतर्गत कार्यान्वित केंद्रांना दैनंदिन खर्च भागविता यावा, यासाठी दर १५ दिवसांनी त्यांचे देयक अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र पुरवठा विभागाकडून अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात असून तीन ते चार महिन्यांपासून देयक प्रलंबित असल्याने केंद्र चालकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
................
कोट :
जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांचे देयक यापूर्वी कधीच प्रलंबित राहिले नाही; मात्र गत तीन ते चार महिन्यांपासून बदली प्रक्रिया आणि काही तांत्रिक अडचणींमुळे देयक प्रलंबित राहण्याचा प्रश्न उद्भवला. तो लवकरच निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- सुनील महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम
..................
कोट :
२१ जून रोजी अनसिंग येथे मला शिवभोजन थाळी वितरण केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येकास मोफत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे; मात्र त्याचे देय अनुदान मिळालेले नाही. यामुळे दैनंदिन खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला आहे.
- सुनीता सावळे, अनसिंग
...........
शिवभोजन थाळी योजनेंतर्गत दैनंदिन १५० थाळी मोफत जेवण पुरविण्यात येत आहे; मात्र त्याचे देयक प्रशासनाकडे प्रलंबित आहे. ते मिळण्यासंबंधी वारंवार पाठपुरावा करूनही काही फायदा झाला नाही. देयक अदा झाल्यास खर्च भागविणे शक्य होणार आहे.
- गजानन दहात्रे, वाशिम