मोठा गाजावाजा, खर्च व प्रयत्न करून स्वच्छता मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी मागील काही दिवसापूर्वी करण्यात आली, तरी मात्र जिल्ह्यात कित्येक लोक उघड्यावर शौचास जात आहेत. परिणामी हागणदारीमुक्त गाव मिशन यशस्वी होऊ शकले नाही. आजही गावाबाहेर ठिकठिकाणी लोक उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून पुन्हा गुड मॉर्निंग पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या गुड मॉर्निंग पथकांना २४ मार्च रोजी वाशिम जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी हिरवी झेंडी दाखविली. २५ मार्च रोजी सकाळी सहा वाजता मॉर्निंग पथक शिरपुरात दाखल झाले. यावेळी आठवडी बाजारात उघड्यावरच बसलेल्या व्यक्तीने गुड मॉर्निंग पथकाच्या गाडीवरील लाऊड स्पीकरचा आवाज ऐकून पळ काढला. तर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात उघड्यावर शौचास बसलेल्या काही लोकांनी पळ काढला. तर तिघा जणांना पथकातील विजय धागे व बाळू इंगोले यांनी उठाबशा काढायला लावल्या व पुन्हा उघड्यावर शौचास बसू नये अशी समज दिली. अन्यथा बाराशे रुपये दंडाची कारवाई सुद्धा करण्यात येईल असा इशारा दिला.
बरीच कुटुंब शौचालय बांधकामापासून वंचित
उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने गावाकडे येणारे सर्व रस्त्यावर अस्वच्छता निर्माण होत आहे.या गरीब कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी शासनाने अनुदान द्यावे. जेणेकरून स्वच्छता अभियान यशस्वी होईल. मोठ्या प्रमाणात लोक उघड्यावरच जात असताना दुसरीकडे मात्र हागणदारी मुक्त गाव असे फलक लावण्यात आले आहेत. अजूनही बरेच कुटुंब शाैचालय बांधकामापासून वंचित दिसून येत आहेत.