वाशिम : पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती घेण्याची घोषणा केल्यानंतर, पात्र उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. राज्यभरातून जवळपास ८४ हजार अर्ज दाखल झाले असून, या उमेदवारांना मुलाखतीची प्रतिक्षा आहे. मुलाखतीचे वेळापत्रक निश्चित नसल्याने शिक्षक भरती निवडणूक आचारसंहितेपूर्वी होणार की नाही, याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.गत नऊ वर्षांपासून शिक्षक भरती नाही. शिक्षक भरती सुरू करण्यासंदर्भात विविध स्तरातून मागणी समोर आल्याने शेवटी शिक्षक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. शिक्षक भरतीची प्रक्रिया पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून ‘पवित्र पोर्टल’द्वारे आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. वाशिमसह राज्यभरातून जवळपास ८४ हजार अर्ज प्राप्त झाले. विद्यार्थ्यांना माध्यम, विषय, गुणनिहाय प्राधान्यक्रम द्यावयाचे होते. त्यात शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित संस्थांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्राधान्यक्रमाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार गुणवत्ता यादी जाहीर करुन मुलाखतीची प्रक्रिया होणार आहे. अद्याप मुलाखतीचे वेळापत्रक निश्चित झाले नसल्याने हजारो डीटीएड, बीएडधारक उमेदवार संभ्रमात आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात वाशिम येथे २२ जुलै रोजी अर्जुन सुर्वे व विशाल ठाकरे या दोन युवकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर चढून घंटानाद आंदोलनही छेडले होते. यावेळी शिक्षक भरतीची कार्यवाही शासनस्तरावरून सुरू असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. शिक्षक भरतीची प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होणार, याची प्रतिक्षा हजारो उमेदवारांना लागून आहे.
हजारो उमेदवारांना शिक्षक भरतीची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 3:29 PM