लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : देशभरातील बंजारा समाजबांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे शनिवार, १३ एप्रिल रोजी श्रीरामनवमीचा उत्सव हर्षोल्लासात साजरा झाला. यानिमित्त हजारो भाविकांनी जगदंबा माता, सामकीमाता, ज्योतीबा, संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज, धर्मगुरु संत रामराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक होवून दर्शनाचा लाभ घेतला.दरवर्षीप्रमाणे यंदाही बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजता श्रीराम जन्मोत्सव, संत सेवालाल महाराज जन्मोत्सव, राष्ट्रसंत रामराव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यानंतर भोग चढवून भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावर्षी यात्रा महोत्सवादरम्यान भाविकांनी बोकडबळी देवू नये, यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर जनजागरण मोहिम राबविण्यात आली. तरीसुद्धा पोहरादेवी येथील शेतशिवारातील झाडाझुडपांचा आधार घेवून अनेक भाविकांनी बोकडबळी देवून नवस फेडल्याचे दिसून आले.यावर्षी देशभरात लोकसभा निवडणूक होत असल्याने विविध राज्यातून पोहरादेवीत श्रीरामनवमीसाठी येणारे भाविकांचे थवे गतवर्षीच्या तुलनेत काहीसे कमी झाल्याचे दिसून आले. हजारो भाविकांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी पाहरादेवी, वसंतनगर, उमरी खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने ठिकठिकाणी टँकरव्दारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासनाच्या वतीने यात्रेदरम्यान आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या. तसेच महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘बेटी बचाव बेटी पढाओ’बाबत जनजागृती करण्यात आली. बांधकाम विभागाने भाविकांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी फिरते शौचालय उभारले होते.राज्याचे महसूलमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, माणिकराव ठाकरे, कर्नाटकचे आमदार प्रभु चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी यात्रास्थळी हजेरी लावली. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यात्रेसाठी महाराष्ट्र तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणावर बसेस पोहरादेवीत दाखल झाल्या होत्या.
पोहरादेवी येथे हजारो भाविक नतमस्तक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 2:21 PM