वाशिम: धनगर समाज आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाला आहे. या संदर्भात येत्या ११ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर धनगर समाजाच्यावतीने हल्लाबोल मोर्च काढण्यात येणार असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील हजारो धनगर समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे प्रदेश युवक अध्यक्ष सुरेश मुखमाले यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
धनगर समाजाच्या विविध मागण्या शासनदरबारी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीबाबतचे आरक्षण मिळणे, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणे, धनगरांच्या मेंढ्या चराईचा प्रश्न सोडविणे, सरकारी नोकरीतून बडतर्फ करण्याची कार्यवाही थांबविणे आदिंचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान राज्य शासनाने या मागण्या निकाली काढण्याबाबत वेळोवेळी आश्वासन दिले; परंतु आजवरही यातील एकाही मागणीवर निर्णय झालेला नाही. त्यातच धनगर समाज हा पूर्वीपासून अनुसूचित जमातीमध्ये असून, या समाजाला नव्याने अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची आवश्यकता नाही. राज्यात आमची सत्ता आल्यास तातडीने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस त्यांनी डिसेंबर २०१३ मध्ये भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलताना दिले होते. ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नागपूर येथे ४ जानेवारी २१५ रोजी धनगर समाजाच्या मेळाव्यातही धनगर समाजाला आम्ही जो शब्द दिला. त्यापासून मागे हटणार नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आमचे सरकार तातडीने घेईल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला होता; परंतु यालाही दोन वर्षे उलटली तरी, काहीच झाले नाही. राज्य शासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळली असून, येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यभरातील धनगर समाजबांधवांकडून ११ डिसेंबर रोजी काढण्यात येणाºया हल्लाबोल मोर्चात त्याची प्रचिती येणार आहे, असे अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे प्रदेश युवक अध्यक्ष सुरेश मुखमाले यांनी सांगितले. तसेच वाशिम जिल्ह्यातील हजारो धनगर बांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.