लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र रविवार, १४ एप्रिल रोजी हर्षोल्लासात साजरी झाली. वाशिम येथील समाजबांधव, अनुयायांनी स्थानिक आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करीत अभिवादन केले.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांकडून ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासह काही ठिकाणी समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले. जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातही उत्स्फूर्त मिरवणूका काढण्यात आल्या. महिलांनी पांढºया रंगाच्या साड्या; तर पुरूषांनीही पांढरे वस्त्र परिधान करून डोक्यावर, गळ्यात निळा रुमाल घालून मोठ्या संख्येने मिरवणूकांमध्ये सहभाग नोंदवून महामानवाच्या जयंतीला आगळेवेगळे स्वरूप प्रदान केले. या मिरवणूकांमध्ये इतरही जाती-धर्माच्या नागरिकांनी सहभागी होत सर्वधर्मसमभावाचा प्रत्यय दिला. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा शांतता भंग होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात ठेवल्याचे दिसून आले. प्रशासकीय कार्यालयांमध्येही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हजारो अनुयायांचे बाबासाहेबांना अभिवादन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:01 IST