वाशिम : वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आल्याने, या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी १२१ असल्याचा दावा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात या गावातील नागरिकांना गत दीड महिन्यांपासून घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपिट करावी लागत असल्याचे वास्तव आहे. माळेगाव येथे दरवर्षी उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाई निर्माण होते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यापूर्वी प्रशासनाने प्रयत्नही करण्यात आले. सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माळेगावात जलसंधारणाची कामे करण्यात आली. जलसंधारणाच्या कामानंतर सर्वे केला असता, या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी १२१ असल्याचा दावा प्रशासनाने केला. प्रशासनाच्या लेखी माळेगाव हे गाव पाण्याच्या दृष्टिने परिपूर्ण आहे. प्रत्यक्षात या गावाला भेट दिली असता, परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून आले. माळेगाव येथे पाणीपुरवठा योजना असून, सद्यस्थितीत पाणीपुरवठा करणारी विहिर कोरडीठण्ण असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. गावातील हातपंप, विहिरींनी तळ गाठल्याने गावापासून गावापासून दीड किमी अंतरावर असलेल्या एका विहिरीवरून सायकल, बैलबंडी किंवा मिळेल त्या साधनांनी पाणी आणण्याची कसरत गावकºयांना करावी लागते. या विहिरीत साधारणत: एक महिना पुरेल एवढा जलसाठा असल्याने एका महिन्यानंतर काय? या विचाराने गावकºयांची झोप उडाली आहे. प्रशासनाच्या लेखी माळेगाव १०० टक्के ‘वॉटर न्यूट्रल’ अर्थात पाण्याने परिपूर्ण आहे तर दुसरीकडे गावकºयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, अशी विसंगत परिस्थिती माळेगावात दिसून येते. - कित्येक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. प्रशासनाकडून कायमस्वरुपी उपाययोजना केली जात नाही. मागील दीड महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.- भीमराव राघोजी जाधव, ग्रामस्थ, माळेगाव ता.जि. वाशिम
घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपीट ! ‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या माळेगावातील भीषण वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 2:18 PM