लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: बाजारात नव्या मुगाची आवक सुरू झाली आहे. तथापि शासनाने या शेतमालास ७ हजार रुपयांपर्यंत हमीभाव जाहीर केले असताना बाजार समित्यांत मात्र अधिकाधिक ५५०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल दराने या शेतमालाची खरेदी केली जात आहे. अर्थात शेतकऱ्यांना हमीदरापेक्षा हजार रूपयांहून कमी दर मिळत असल्याचे दिसत आहे.खरीप हंगामातील कमी कालावधीचे पीक असलेले मुग आणि उडिद यांची काढणी आता जवळपास पूर्ण झाली असून, या शेतमालाची आवकही बाजारात सुरू झाली आहे. यंदा मान्सूनला विलंब झाल्याने जिल्ह्यात मुग आणि उडिदाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. वेळ निघून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकाची पेरणीच केली नाही. त्यात पावसाच्या अनियमिततेमुळे या पिकाच्या उत्पादनातही मोठी घट आली. आता मुगाची काढणी झाल्यानंतर शेतकरी बाजारात या शेतमालाची विक्री करीत आहेत. तथापि, शासनाने यंदा मुगाला ७ हजार रुपयांवर हमीभाव जाहीर केले असताना आणि उत्पादनात प्रचंड घट आली असतानाही बाजारात मात्र अवघ्या ५५०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल दराने या शेतमालाची खरेदी होत आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीने पिचून गेलेल्या शेतकºयांना अल्पदरामुळे या पिकावर केलेला खर्चही वसुल होणे कठीण झाले असून, शासनाने बाजार व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून शेतकºयांच्या मालास योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मुग उत्पादक शेतकºयांकडून होत आहे.इतर शेतमालास समाधानकारक दरबाजारात व्यापाºयांकडून मुगाला हमीदरापेक्षा तब्बल हजार रुपये कमी दर मिळत असला तरी, इतर शेतमालास मात्र समाधानकारक दर मिळत आहेत. तुरीचे हमीदर ५८०० रुपये असताना या शेतमालास ५६०० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल, उडिदाचे हमीदर ५७०० रुपये प्रति क्विंटल असताना या शेतमालास ५४०० ते ५६०० रुपये प्रति क्विंटल, तसेच सोयाबीनचे हमीदर ३७१० रुपये प्रति क्विंटल असताना त्यापेक्षा अधिक दर मिळत आहेत.
बाजार समित्यांमधील व्यापाºयाना हमीभावाने खरेदी करण्याची सक्ती करता येत नाही. शेतकºयांच्या समस्येबाबत केवळ त्यांच्याशी सामंजस्याने चर्चा करणे शक्य आहे.-रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक (वाशिम)