जिल्ह्यात मंगरूळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड येथे चार मुख्य बसस्थानके, तर मानोरा आणि मालेगावातही प्रवाशांची चढ-उतर करण्यासाठी बसस्थानके उभारण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ मंगरूळपीर येथील बसस्थानक परिसरातील डांबरीकरण गेल्या ३५ वर्षांपासून अद्यापही बव्हंशी सुस्थितीत आहे, तर इतर सर्वच ठिकाणी डांबरीकरणाचा आता पत्ताच नसून, परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून गटारे तयार होत असल्याने विविध ठिकाणी प्रवास करणारे हजारो प्रवासी गटारे तुडवतच बसमध्ये चढ-उतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
----------------
जिल्ह्यातून धावणाऱ्या एकूण बसफेऱ्या- ३४९
जिल्ह्यातील एकूण आगार- ०४
जिल्ह्यातील एकूण बसस्थानके- ०६
जिल्ह्यातील एसटी बसची संख्या- १८६
-----------
आगारनिहाय एसटी बस
आगार- एकूण बस
मंगरूळपीर- ४३
वाशिम- ४९
कारंजा- ४८
रिसोड- ४५
----------------------
फलाटावरही पसरते घाण
बसस्थानक परिसरात डांबरीकरण नसल्याने बसगाड्यांभोवतालच्या जागेत गटारे साचतात. या गटारातूनच प्रवाशांना ये-जा करावी लागते. त्यामुळे चपला, जोड्यांना चिखल, घाण चिकटून ती बसस्थानकात फलाटापर्यंत पसरते. त्यामुळे फलाटांवरही सतत घाण साचत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
------
जंतूसंसर्गाला वाव, आरोग्याला धोका
बसस्थानक परिसरात साचणारी गटारे आणि त्यामुळे फलाटावर पसरणाऱ्या घाणीतून डास, माशांची उत्पत्ती वाढते आणि यातूनच जंतू, विषाणूचा प्रादुर्भावही वाढत असल्याने येथे बसगाड्यांची प्रतीक्षा करीत बसणाऱ्या हजारो प्रवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे.
---------------
घाणीमुळे प्रवाशांना एसटी नकोशी
कोट :
वाशिम येथील बसस्थानक परिसरात फूटभर जागाही पाय ठेवण्यासारखी राहिली नाही. सर्वत्र पाणी साचून गटार तयार झाले आहे. या बसस्थानकावर बसमधून उतरताना आणि चढतानाही गटार तुडवत जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात एसटीचा प्रवास नकोसा वाटतो.
-विजय आसरे, प्रवासी
---------
कोट :
गेल्या १५ वर्षांपासून कारंजा बसस्थानक परिसरातील डांबरीकरण नाहीसे झाल्याने येथे पावसाळ्यात गटारे साचतात, तर उन्हाळ्यात धुळीचे लोळ उडतात त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. परिसराची डागडुजी मात्र केली जात नाही.
-राजेश मोखडकर, प्रवासी
----------------------
आगार व्यवस्थापकांचा पाठपुरावा
कोट :
वाशिम येथील बसस्थानक परिसरातील डांबरीकरण नाहीसे झाले आहे. या परिसरात डांबरीकरण करण्यासाठी विभाग स्तरावर नियमित पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू असतो; परंतु अद्याप त्या स्तरावरून कामाबाबतचा निर्णय झाला नाही.
-विनोद इलामे,
आगार व्यवस्थापक, वाशिम
-----------------
कोट : बसस्थानक परिसरात डांबरीकरण करून परिसर सुसज्ज करण्यासाठी आमचा वरिष्ठ स्तरावर नियमित पाठपुरावा सुरू असतो. प्रवाशांना त्रास होऊ नये, अशी आमचीही इच्छा आहे; परंतु याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरूनच होतो.
-मुकुंद न्हावकर,
आगार व्यवस्थापक, कारंजा