लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील बसस्थानकांच्या परिसराची स्थिती अत्यंत वाईट आहे. एसटी बस थांबविण्याच्या परिसरातील डांबरीकरण दहा- बारा वर्षांपासून उखडले असतानाही डांबरीकरण करण्याची तसदी घेण्यात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात हजारो प्रवाशांना येथे साचणाऱ्या गटारातूनच बसमध्ये चढ-उतर करावी लागत आहे.जिल्ह्यात मंगरूळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड येथे चार मुख्य बसस्थानके, तर मानोरा आणि मालेगावातही प्रवाशांची चढ-उतर करण्यासाठी बसस्थानके उभारण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ मंगरूळपीर येथील बसस्थानक परिसरातील डांबरीकरण गेल्या ३५ वर्षांपासून अद्यापही बव्हंशी सुस्थितीत आहे, तर इतर सर्वच ठिकाणी डांबरीकरणाचा आता पत्ताच नसून, परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून गटारे तयार होत असल्याने विविध ठिकाणी प्रवास करणारे हजारो प्रवासी गटारे तुडवतच बसमध्ये चढ-उतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चिखल तुडवत बसमध्ये चढउतार करतांना प्रवाशांना मोठा त्रास होत आहे.
वाशिम येथील बसस्थानक परिसरातील डांबरीकरण नाहीसे झाले आहे. या परिसरात डांबरीकरण करण्यासाठी विभाग स्तरावर नियमित पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू असतो; परंतु अद्याप त्या स्तरावरून कामाबाबतचा निर्णय झाला नाही.-विनोद इलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम