मानाेरा (जि. वाशिम) : अमरावती विभागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत जमावबंदीचे आदेश दिले होते. परंतु, नियमांना सत्ताधारी मंत्री आणि त्यांच्या समर्थकांकडूनच फाटा देण्यात आल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी पोहरादेवी येथे निदर्शनास आला.
कोविडबाबत सर्वांना नियम सारखे असून ते पाळता गर्दी करणाऱ्यांवर पोलीस आणि प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत. सामाजिक अंतर राखणे, प्रत्येकाने मास्क घालण्यासंबंधीच्या सूचना असतानाही पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या भेटीदरम्यान पूर्ण विपरित चित्र होते.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर अनेक दिवसांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर राहिलेले राठोड मंगळवारी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे दर्शनासाठी दाखल झाले. या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्कीही झाली. समर्थकांनी पोलिसांवर दगड भिरकावल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. राठाेड समर्थकांनी सकाळपासूनच पाेहरादेवीत गर्दी केली होती. मंदिर परिसरात हजाराे समर्थक पाेहोचले व घाेषणाबाजी सुरू केली. राठाेड मंदिर परिसरात आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी समर्थक गर्दी करीत असल्याने पाेलिसांनी त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला होता.