संतोष वानखडे, वाशिम - हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील कारंजाजवळ १७ जूनच्या रात्री १२:३० वाजताच्या सुमारास नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसवर दगडफेक करणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात वाशिम पोलिसांना २० जून रोजी यश आले.
१७ जूनच्या रात्री १२:३० वाजताच्या सुमारास नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सची बस कारंजा जवळील ढाकली-किनखेड या परिसरात आली असता, अज्ञात इसमांनी या बसवर दगडफेक केली. त्यात बसच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. दगडफेकीमुळे बसमधील प्रवासीसुद्धा जखमी झाले होते. याप्रकरणी चालक मोहन शिंगारे (५६) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात विषेश तपास पथक नेमुन समृध्दी महामार्गाचे आजुबाजुचे परीसरात गुप्त बातमीदाराकडुन माहिती घेण्यात आली. बाजुचे गावात अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात आला तसेच नागपुर औरंगाबाद हायवेवरील ढाब्यावरील सि.सि.टी.व्ही. फुटेज तपासुन संशयीत आरोपी शुभम दशरथ हांडे (२३) रा. पिंपळगाव हांडे, राम दिगांबर हांडे (२०) व माधव गजानन वाळके (२३) दोन्ही रा.कीनखेड यांना ताब्यात घेवुन कसुन विचारपुस करण्यात आली.
दगडफेक केल्याचा गुन्हा आरोपींनी कबूल केला. नमुद आरोपींनी १७ जून रोजी ढाब्यावर जेवन करुन त्यांचे गावी परत जात असताना समृध्दी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनातील लोकांना गंभीर जखमी करण्याच्या उद्देश्याने ओव्हर ब्रिजवरुन दगडफेक केली व अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात कलम ३२६ भा.दं.वि. समाविष्ठ करण्यात आले. वाशिमचे पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांचे मार्गदर्शनात कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनिल वानखडे, पोलीस उपनिरिक्षक चंदन वानखडे व चमूने आरोपींना पकडले.