वाशिम जिल्ह्यात एकूण प्राथमिक आणि माध्यमिक मिळून ३४० खासगी शाळा आहेत. या शाळांवर ३,५०० शिक्षक कार्यरत आहेत. शासनाने दर महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचे वेतन करण्याचे आदेश दिले असताना त्याची दखल घेतली जात नाही. त्यातच अनेकदा दोन ते तीन महिने शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा करावी लागते. वेतन प्रलंबित राहत असल्याने बँकेचे कर्ज घेतलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना बँकांकडून एक्सट्रा पेनाल्टी लागते. व्याजही शिल्लकचे भरावे लागते. किराणा, भाजीपाला, वीज बिल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आदींचे नियोजन बिघडून जाते. काही शिक्षकांचे आई वडील, कुटुंबांतील सदस्यांना दर महिन्यात दवाखान्यातील रुटीन चेकअपची तारीख १० पूर्वीची असते. वेतन रखडल्याने हे महत्त्वाचे कामही वेळेवर होत नाही. विविध सण, उत्सवाच्या आनंदावर विरजन पडते.
००००००००००००००००००००
दोन वर्षांत एकदाही पहिल्या तारखेस वेतन नाही
जिल्ह्यातील संस्थांच्या शाळावरील शिक्षकांचे वेतन गेल्या दोन वर्षापासून एकाही महिन्यात १ तारखेला झालेला नाही. साधारणत: १५ किंवा २० तारखेनंतरच पगार होतात. वेतन पथक आणि कोषागार कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता वरिष्ठ स्तरावरून निधीच मिळाला नसल्याचे कारण सांगितले जाते. वेतनाला सतत विलंब होत असल्याने शिक्षकांचे नियोजन कोलमडून ते आर्थिक संकटात सापडत आहेत.
०००००००००००००००००
-जिल्ह्यातील एकूण अनुदानित शाळा -३४०
माध्यमिक शिक्षक - १८२०
प्राथमिक शिक्षक - २६८०
-----------
तालुकानिहाय अनुदानित शाळा
तालुका - शाळा
वाशिम - ७५
कारंजा - ५६
मालेगाव - ३७
रिसोड - ६७
मंगरुळ - ५३
मानोरा - ५२
-------------------------
कोट:
खासगी शिक्षकांचे वेतन आमच्याकडून थांबलेले नाही. आम्ही कोषागार कार्यालयात वेळेत बिले सादर केली, परंतु शिक्षकांच्या वेतनासाठी मिळणाऱ्या निधीबाबतची शाहीची प्रत अर्थात निधी मंजूर झाल्याची खरी प्रत ट्रेझरीला मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे जून महिन्याचे वेतन थकले, तर जूनचे वेतन झाल्यानंतरच ऑगस्टची बिले सादर करता येतील.
-बालकृष्ण इंगोले,
वेतन पथक अधीक्षक, वाशिम
---------------------
कोट:
कोरोनामुळे शाळा बंद आहेत याला जबाबदार शिक्षक नसून, सर्व शिक्षक व्यवस्थित ऑनलाईन, ऑफलाईन अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. संसारिक जबाबदारी पूर्ण करताना त्यांनाही वेळेवर पगार मिळावा, ही अपेक्षा आहे. ही समस्या सर्वच खासगी शाळा शिक्षकांची आहे.
-संदीप देंशमुख,
जिल्हाध्यक्ष, शिक्षक महासंघ
---------
कोट:
वेतन प्रलंबित राहत असल्याने बँकेच्या कर्जावर एक्सट्रा पेनाल्टी व व्याजही शिल्लकचे भरावे लागते. किराणा, भाजीपाला, वीज बिल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आदींचे नियोजन बिघडून जाते. एकाही महिन्यात आमचे वेतन पहिल्या तारखेला होत नाही. याची दखल शिक्षण विभागाने घ्यावी.
-राजकुमार खाडे,
शिक्षक तथा जिल्हा कार्याध्यक्ष,
शिक्षक महासंघ वाशिम