वाशिम - महिलांसाठी तीन दिवशीय मोफत कर्करोग निदान शिबिर आयोजित केले असून, ३० जानेवारी रोजी या शिबिराला वाशिम येथे सुरूवात झाली. श्री बालाजी संस्थान, रोटरी क्लब आॅफ अमरावती मिडटाऊन, मॉ गंगा मेमोरीयल ट्रस्ट व मानवसेवा फाऊंडेशनच्या संयुक्त सहभागातून दररोज सकाळी ११ ते ५ यावेळेत तपासणी करण्यात येणार आहे.
३० जानेवारी रोजी स्थानिक मॉ गंगा मेमोरियल ट्रस्ट अकोला नाका वाशिम येथे या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बालाजी संस्थानचे वहिवाटदार विश्वस्त ज्ञा.ना. काळू, मॉ गंगा मेमोरीयल ट्रस्टचे संचालक डॉ. हरिष बाहेती, डॉ. सरोज बाहेती, मानवसेवा फाऊंडेशनचे डॉ. राजीव अग्रवाल, उपाध्यक्ष मनोहर बेलसरे, तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, रोटरी क्लब आॅफ अमरावती मिडटाऊनच्या डॉ. दिपाली फाटक, डॉ. संगीता बाहेती, डॉ. दिपाली दागडीया, पोलीस निरीक्षक सुरेश अग्रवाल, राजदत्त पाठक आदींची उपस्थिती होती. यावेळी अमरावती येथून दानराशीतुन निर्मित रोटरी क्लब आॅफ अमरावती यांच्या मेमोग्राफी बसव्दारे तपासणीस प्रारंभ करण्यात आला.प्रथमच वाशिम शहरात ही भव्य मेमोग्राफी व्हॅन महिला रुग्णांकरीता मोफत उपलब्ध झाली आहे. सदर शिबिरात स्तनाची संपूर्ण तपासणी, गर्भाशय मुखाची तपासणी, स्तन कर्करोगासाठी मेमोग्राफी व मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.हरिष बाहेती, संचालन डॉ. श्रीकांत राजे तर आभार मानवसेवा फाऊंडेशनचे डॉ. राजीव अग्रवाल यांनी मानले. तीन दिवसात दर दिवशी ३५ महिला रुग्णांची तपासणी मोफत होणार आहे.