मंगरूळपीर (जि. वाशिम) : तालुक्यातील मोहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तगत येत असलेल्या ग्राम पोटी येथे डेंग्यूचे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून, गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर मोहरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सावरासावर करण्यात येऊन आता फॉगिंग मशीनने फवारणी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत गलथान कारभाराचा परिचय दिला जात आहे. पोटी येथील दहा वर्षीय मनीषा भगत या बालिकेस डेंग्यूची लागण झाल्याने तिला कारंजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचबरोबर २५ वर्षीय सचिन इंगोले व वैष्णवी पवार (९ वर्ष) यांचे रक्ताचे नमुने अकोला वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविले असता त्यांनाही लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती मिळाली. या प्रकारानंतर मोहरी प्राथमिक आरोग्य केंद्र खडबडून जागे होऊन त्यांनी पोटी गावात फॉगिंग मशीनने फवारणी करणे ग्रामस्थांना मार्गदर्शन करणे हे सोपस्कार पार पाडले. कोणत्याही रोगाची लागण होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना आधीच प्राथमिक आरोग्य केंद्राने करावयाच्या होत्या. त्या न केल्याने अनेक गावातही रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
पोटी येथे आढळले डेंग्यूचे तीन रुग्ण
By admin | Published: August 29, 2015 1:06 AM