................
वाशिम शहरात आढळले सहा रुग्ण
वाशिम : कोरोनाच्या संकट काळात दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णसंख्येत वाशिम तालुका आधीपासूनच क्रमांक एकवर राहिला. आता मात्र हे संकट ओसरत असून, १० जूनला शहरात केवळ सहा बाधित रुग्ण आढळले; तर तालुक्यात दोघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.
................
सात गावांतील विजेचा प्रश्न मिटणार
वाशिम : केशवनगर येथील विद्युत उपकेंद्रानजीक ३.२५ मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मितीचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, सात गावांमधील विजेचा प्रश्न निकाली निघणार आहे.
................
मालेगावात रात्रीची गस्त वाढली
वाशिम : रात्रीच्या सुमारास होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीची गस्त वाढविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
.................
तिब्बल सीट वाहतूक; पोलिसांची कारवाई
वाशिम : स्थानिक पाटणी चाैकात शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून बुधवारी दुपारच्या सुमारास प्रामुख्याने तिब्बल सीट वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई केली. संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.
............
रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी
वाशिम : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, कच्चा स्वरूपातील या रस्त्याला खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
.............
एटीडीएम मशीन कार्यान्वित करा
वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, बाजार समिती, आदी ठिकाणी शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी एटीडीएम मशीन कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
.............
नियमांबाबत वाहकांचे उद्बोधन
वाशिम : महाराष्ट्र राज्य एस.टी. परिवहन महामंडळाच्या बस ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, यासंबंधी बुधवारी वाहकांचे उद्बोधन करण्यात आले.
...................
पदे रिक्त असल्याने मनेरगाची कामे ठप्प
वाशिम : रिसोड तालुक्यातील महसूल विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून, त्याचा थेट परिणाम मनरेगाच्या कामांवर झाला असून, ही कामे गत काही महिन्यांपासून ठप्प झाली आहेत.
............
शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक
वाशिम : शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास वर्षभरातील ३६५ दिवस जलाभिषेक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शहरातील युवक उपस्थित होते.
................
धुवाधार पावसामुळे बाजारपेठेत तारांबळ
वाशिम : गुरुवारी दुपारच्या सुमारास सुमारे दोन तास धुवाधार पाऊस झाला. यामुळे बाजारपेठेत तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर थांबून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचीही धांदल उडाल्याचे दिसून आले.