नंदकिशाेर नारे, वाशिम: महाराष्ट्र केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी रस्ता प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण थांबता थांबेना . ३ जून राेजी रिधोरा ते शेलुबाजार दरम्यान सकाळी ७ वाजताचे दरम्यान उभ्या ट्रकला कारने धडक दिल्याने या अपघातात तीन जण ठार झाले.
अपघात घडल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवीत क्रेन व इतर साहित्य तब्बल साडेतीन ते चार तासानंतर पाठविल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. रिधोरा ते शेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गावर दिसून आले. कार एम.एच. २७ बी.व्ही २७३९ मधून अमरावती कडे जात असताना उभे असलेल्या ट्रक क्र एम.एच १५ जे.सी ९६९५ ट्रकच्या मागून धडक दिल्याने मोठा अपघात घडला.
याबाबत समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना महामार्ग पोलिसांना माहिती देऊन सुद्धा सदर अधिकाऱ्यांनी अर्ध्या तासाच्या आत मदत पुरविण्याची तरतूद असताना तब्बल साडेतीन ते चार तास वेळ लावल्यामुळे दोघांचा कारमध्येच मृत्यू झाला तर एका जखमीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केले. मृतकामध्ये सादल काजी, आलम हुसेन (टॅक्स ऑफिसर), आरिफ खान यांचा समावेश आहे.