- प्रफुल बानगावकर लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : शेती परवडत नाही, अशी ओरड काही जणांकडून होते तर काही जण मेहनतीच्या बळावर कमी एकरातून अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. कारंजा तालुक्यातील खेर्डा कारंजा येथील जमीर खान नजीर खान या शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शनात अवघ्या दोन महिन्यात एका एकरातील भाजीपाला रोप विक्रीतून तीन लाखाचे उत्पन्न घेतले आहे.मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. तत्पूर्वी खेर्डा कारंजा येथील नदीम शेख नजीर शेख यांनी कृषी विभाग कारंजा कार्यालयाशी संपर्क साधून एकात्मिक फलोत्पादन विभागकडून १० लाखाचे अनुदान आणि स्वत:चे १० लाखाचे भाग भांडवल असे मिळून २० लाखाचे १०० बाय ४० चौरस फुट परिसरात हरीतगृह उभारले. लॉकडाऊनच्या कालावधीत भाजीपाला बिज उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. मे ते जून या दरम्यान शिमला मिरची, साधी मिरची, फुलगोबी, पानगोबी, टमाटे आदी भाजीपाला रोपे या ठिकाणी घेतली. आतापर्यंत पाच लाख रोपाची विक्री करण्यात आली. पाच लाख रुपये उत्पादन झाले असून, यापैकी लागवड व अन्य खर्च वजा जाता तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे जमीर खान नजीर खान यांनी सांगितले.इतरांसाठी प्रेरणादायीशेतीतून फारसे उत्पन्न घेता येत नाही, अशी मानसिकता बनविलेल्या शेतकºयांसाठी खेर्डा कारंजा येथील शेतकरी जमीर खान नजीर खान यांचा यशस्वी प्रयोग प्रेरणादायी आहे. केवळ दोन महिन्यात एक एकर शेतीतून ३ लाख रुपयाचा निव्वळ नफा त्यांनी मिळविला आहे. या कामी त्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे मोलाचे मार्गदर्शनही लाभले.
भाजीपाल्याची चांगल्या दर्जाची रोपे शेतकऱ्यांना अल्पदरात उपलब्ध होत आहे. या ठिकाणी भेट देऊन पाहणीदेखील करण्यात आली. कमी दिवसात जास्त उत्पन्न या माध्यमातून घेतल्या जात आहे. या भाजीपाला रोपे विक्रीतून जवळपास तीन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.-संतोष वाळके,तालुका कृषी अधिकारी कारंजा