मंगरुळपीर (जि. वाशिम): मालवाहू वाहनातून विक्रीसाठी नेण्यात येत असलेला २ लाख ८६ हजारांचा गुटखा मंगरुळपीर पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी पकडला. यावेळी गुटखा पुड्या व वाहन मिळून पोलिसांनी ५ लाख ८६ हजारांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, इतर दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास शहरातील मानोरा रोडवरून एमएच-२९, टी-६२0४ क्रमांकाच्या टाटा ४0७ या मालवाहक वाहनातून विक्रीसाठी नेण्यात येणार्या आणि आरोग्यास हानीकारक असलेल्या विमल गुटख्याच्या पुड्याचे ३८ बॉक्स मंगरुळपीर शहरात विक्रीसाठी आणण्यात येत होते. पोलिसांनी तपासणी करून गुटख्याचे २ लाख ८६ हजार रुपये किमतीचे ३८ डबे, तसेच ३ लाख रुपयांचे वाहन मिळून एकूण ५ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी आरोपी वाहनचालक सय्यद सकरू सय्यद खालिद, अजय भगवान धकाते या दोन आरोपींना अटक केली, तर अ. साजिद अ रज्जाक, तसेच महम्मद जाकीर अब्दुल सलाम हे दोन आरोपी फरार झाले. मंगरूळपीर पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार हेमंत गिरमे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पांचाळ, कदम, रवी राजगुरे आणि मापारी करीत आहेत. मंगरुळपीर येथे गुटखा टाटा ४0७ वाहनातून विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मंगरुळपीर पोलिसांना मिळाली. त्यानुसार ठाणेदार हेमंत गिरमे यांनी सदर वाहनावर पाळत ठेवली. गुटखा घेऊन येत असलेले वाहन मानोरा मार्गे मंगरुळपीरमध्ये दाखल होताच ठाणेदार हेंमत गिरमे यांच्यासह पोलिसांनी सदर वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये विमल गुटख्याच्या पुड्याचे ३८ खोके आढळून आले. गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांना आणखी कडक मोहीम राबवावी लागणार आहे.
यवतमाळ जिल्हय़ातील आर्णी येथून आला गुटखा
मंगरुळपीर पोलिसांनी पकडलेला गुटखा यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथून आणण्यात आला. या संदर्भात मंगरुळपीरचे ठाणेदार हेमंत गिरमे यांना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांच्या गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यांनी सदर वाहनावर पाळत ठेवली. गुटखा घेऊन जाणारे वाहन मंगरुळपीर शहरात दाखल होत असताना सदर वाहनासोबत गुटख्याची विक्री करणारे व्यापारी आरोपी अ. साजिद अ. रज्जाक, तसेच महम्मद जाकीर अब्दुल सलाम हे दोघे दुचाकीवरून येत होते. मंगरुळपीर पोलिसांच्या कारवाईपूर्वीच हे दोघेही फरार झाले.