गरोदर असताना किंवा प्रसूतीच्या वेळी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याबाबत जागृती नसणे, रुग्णालयात नेत असताना वाहनाची सोय नसणे आणि रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होणे, रुग्णालयात गेल्यानंतर उपचारास विलंब लागणे, तयारी नसणे किंवा रक्त, शस्त्रक्रियेची वेळेवर सुविधा न मिळणे, ही मातामृत्यूची कारणे असून गरोदरपणात, गर्भपात करतेवेळी किंवा बाळंतपणात रक्तस्राव होणे, जंतूदोषामुळे शरीरात गंभीर आजार होणे, अडलेले बाळंतपण, झटके, अतिरक्तदाब, गर्भपात, दूषित गर्भपात, हिवताप, रक्तपांढरी या कारणांमुळेही मातामृत्यू होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान, वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २०२० या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २,१९३ महिलांची प्रसूती झाली. त्यात १७४ महिलांचे सीझरचे तर २,०१९ महिलांची नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्यात तीन मातांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली.
...........................
कुठल्या महिन्यात किती?
एप्रिल- २१८/२५/१९३/१
मे - २२२/२६ १९६/००
जून - २०२/२१/१८१/००
जुलै - २३३/१८/२१५/००
ऑगस्ट - २७४/११/२६२/००
सप्टेंबर - २६८/१३/२५५/००
ऑक्टोबर -२७९/१८/२६१/१
नोंव्हेंबर - २६७/२४/२४३/१
डिसेंबर - २३०/१८/२१२/००
.............
ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक प्रसूती
गतवर्षी ऑक्टोबर २०२० या महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वाधिक २७९ महिलांची प्रसूती झाली. त्यात १८ महिलांचे सीझर तर २६१ महिलांची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. या महिन्यात एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळातही प्रत्येक महिन्यात २०० पेक्षा अधिक महिलांची जिल्हा रुग्णालयात सुरक्षितरीत्या प्रसूती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...................
२०२० मध्ये प्रसूतीसाठी रुग्णालयात आलेल्या महिला
सीझर - १७४
नॉर्मल - २०१९
मातामृत्यू - ०३
.............
कोट :
वाशीमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अन्य रुग्णांप्रमाणेच गरोदरपणातील महिलांची विशेष काळजी घेतली जाते. एप्रिल ते डिसेंबर २०२० या नऊ महिन्यात प्रसूतीकरिता एकूण २,१९३ महिला रुग्णालयात दाखल झाल्या. त्यातील २,१९० महिलांची प्रसूती सुरक्षितरीत्या झाली. मात्र दोन महिला बाहेरूनच गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्या होत्या तर एका महिलेला अधिक रक्तस्राव झाल्याने एकूण तिघींचा मृत्यू झाला.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशीम
.............
मातामृत्यूसाठी रक्तदाब, रक्तस्राव प्रमुख कारण
मातामृत्यूमध्ये अधिक किंवा अत्यंत कमी रक्तदाब असणे, प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्राव होणे ही कारणे प्रमुख मानली जात आहेत. वाशीमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यादृष्टीने व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे.