वाशिम : गरोदरपण व बाळंतपणात मातामृत्यूचे प्रमाण रोखण्याकरिता आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात बहुतांशी यशदेखील मिळत आहे; मात्र गंभीर अवस्थेत मृत्यू टाळता येणे अशक्य ठरत असल्याचे दिसत आहे. वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात तीन मातांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गरोदर असताना किंवा प्रसूतीच्या वेळी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याबाबत जागृती नसणे, रुग्णालयात नेत असताना वाहनाची सोय नसणे आणि रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होणे, रुग्णालयात गेल्यानंतर उपचारास विलंब लागणे, तयारी नसणे किंवा रक्त, शस्त्रक्रियेची वेळेवर सुविधा न मिळणे, ही मातामृत्यूची कारणे असून गरोदरपणात, गर्भपात करतेवेळी किंवा बाळंतपणात रक्तस्राव होणे, जंतूदोषामुळे शरीरात गंभीर आजार होणे, अडलेले बाळंतपण, झटके, अतिरक्तदाब, गर्भपात, दूषित गर्भपात, हिवताप, रक्तपांढरी या कारणांमुळेही मातामृत्यू होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान, वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २०२० या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २,१९३ महिलांची प्रसूती झाली. त्यात १७४ महिलांचे सीझरचे तर २,०१९ महिलांची नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्यात तीन मातांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदरपणात प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक प्रसूती गतवर्षी ऑक्टोबर २०२० या महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वाधिक २७९ महिलांची प्रसूती झाली. त्यात १८ महिलांचे सीझर तर २६१ महिलांची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. या महिन्यात महिलेचा मृत्यू झाला.
माता मृत्यूसाठी रक्तदाब, रक्तस्त्राव प्रमुख कारणमाता मृत्यूमध्ये अधिक किंवा अत्यंत कमी रक्तदाब असणे, प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्त्राव होणे ही कारणे प्रमुख मानली जात आहेत. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यादृष्टीने व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२० या नऊ महिन्यात प्रसूतीकरिता एकूण २,१९३ महिला रुग्णालयात दाखल झाल्या. त्यातील २,१९० महिलांची प्रसूती सुरक्षितरीत्या झाली. मात्र दोन महिला बाहेरूनच गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्या होत्या तर एका महिलेला अधिक रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला.- डॉ. मधुकर राठोड, सीएस, वाशिम