वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींची निवड २३ व २४ आॅक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. याकरिता इच्छुक युवक, युवतींनी वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमधील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी बुधवारी केले.
१८ ते २५ वर्षे वयोगटातील इच्छुक युवक-युवतींना या मोफत प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येणार आहे. याकरिता पुरुष उमेदवारांची छाती ७८ ते ८३ से.मी. तसेच उंची किमान १६५ से.मी. असणे आवश्यक आहे. महिलांची उंची किमान १५५ से.मी. असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी इयत्ता बरावी उत्तीर्णची गुणपत्रिका, रहिवाशी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, सेवायोजन नोंदणी प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या युवक-युवतींना अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे तीन महिन्याच्या कालावधीचे मोफत प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाबाबतच्या सोयी-सुविधा शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त केदार यांनी सांगितले.