लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून, शुक्रवार १९ जून रोजी प्राप्त अहवालांपैकी तिघांचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७१ झाली असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू तर १३ जणांनी कोरोनावर मात केली असून, एकूण ५६ रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल महिन्यात आढळला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक परतत असून, यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्य, परजिल्ह्यातून परतणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयांत केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्याची व्यवस्थाही तालुकास्तरावरच करण्यात आली. दरम्यान, १७ व १८ जून रोजी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल १९ जून रोजी अहवाल प्राप्त झाले. यापैकी कारंजा लाड येथील तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले असून, त्यात भीमनगर, येथील एका २३ वर्षीय युवकाचा कोरोना विषयक अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. सदर युवक अकोला येथे मृत्यू पावलेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आला होता. त्याशिवाय माळीपुरा, कारंजा लाड येथील १० व ११ वर्षीय मुलांचा समावेश आहे. ही दोन्ही मुले यापूर्वी कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कांतील आहेत. या तिघांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)४८ रुग्णांत कोरोनाची लक्षणेच नाहीत.जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ७१ रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर १३ जणांनी कोरोनावर मात केली, तर उरलेल्या ५६ रुग्णांपैकी केवळ ५ रुग्णांत कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे दिसत असून, इतर ४८ रुग्णांपैकी एकातही कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे नसल्याचे प्राप्त माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
एका महिलेची कोरोनावर मात जिल्हा आरोग्य विभागाला शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रामगाव ता. मंगरुळपीर येथील महिलेने कोरोनावर मात केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाºया रुग्णांची संख्याही १३ झाली आहे. रामगाव येथील कोरोनाबाधित महिलेवर मंगरुळपीर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. शुक्रवारी प्राप्त अहवालानंतर तिला रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला आहे.