०००
रेशीम अभियानावर कोरोनाचा परिणाम
वाशिम : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाचा प्रभाव आता विविध व्यवसायांसह शेती निगडित योजनांवरही पडत आहे. महारेशीम अभियानावरही कोरोना संसर्गाचा प्रभाव पडत असून, यंदा केवळ ५४ शेतकऱ्यांनी या अंतर्गत प्रस्ताव सादर केले आहेत.
००
शिरपूर परिसरात अवैध रेती वाहतूक
वाशिम : जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून शिरपूर परिसरातून अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असून, अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी युवकांनी तालुका प्रशासनाकडे गुरुवारी केली आहे.
०००
आत्मा अभियानाची कामे थांबली
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने कृषी विभागाच्या विविध योजना राबविण्यात अडचणी येत आहेत. त्यात आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांतील कामे थांबली आहेत. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीला विलंब होत आहे.
०
करवसुलीवर होणार परिणाम
वाशिम : कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या करवसुलीवर परिणाम होत आहे. ग्रामपंचायतींचा बहुतांश कारभार दरवर्षी गोळा होणाऱ्या करामधूनच चालतो; मात्र कोरोना संकटामुळे सर्वसामान्य कुटुंब अडचणीत सापडले असून, कर कसा भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
०००
जऊळका कॅम्प येथे दुसऱ्या दिवशी तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका कॅम्प येथील आणखी एका जणास कोरोना संसर्ग झाल्याचे २१ एप्रिल रोजी निष्पन्न झाले. खबरदारीचा उपाय म्हणून दुसऱ्या दिवशीही आरोग्य चमूने जऊळका कॅम्प गाठत कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी केली.
००
जमिनीचा मोबदला द्या; अन्यथा उपोषण
वाशिम : लघु पाटबंधारे विभागांतर्गंत उभारणी करण्यात येत असलेल्या उमरी प्रकल्पाकरिता शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्वरित मोबदला न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडे शेतकऱ्यांनी दिला आहे.
००
कोरोना चाचणीसाठी वाशिम येथे गर्दी
वाशिम : संदिग्ध रुग्ण तसेच व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीसाठी कोविड केंद्रात एकच गर्दी होत असून, कोरोना नियमांचे कोणतेच पालन होत नसल्याचे गुरुवारी दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.
००
ग्रामीण भागात धूरमुक्त अभियानाला खीळ
वाशिम : एलपीजी गॅस-सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढच होत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट विस्कळीत होत असून, ग्रामीण धूरमुक्त अभियानाला खीळ बसत आहे. गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात यावेत, अशी मागणी महिलांमधून होत आहे.
०००
हराळ येथे कोरोना जनजागृती
वाशिम : रिसोड तालुक्यातील हराळ येथे कोरोना संसर्ग पाहता गावात जनजागृती करण्यात येत आहे. गुरुवारी आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रशासनातर्फे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली.
००