वाशिम : शहर पोलिसांच्या पथकाने गेल्या तीन दिवसांत चार आरोपींवर कायद्यातील कलम ३, ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करत तीन धारदार खंजीर आणि देशी कट्टा जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, २७ जून रोजी जुनी नगर परिषद परिसरात सत्यजित मारोती वानखडे (२५) या युवकास आणि महात्मा फुले चौकातून अभिषेक सुभाष भुजाडे (२०) या दोघांना ताब्यात घेत पंचासमक्ष त्यांची झडती घेण्यात आली. संबंधितांकडे धारदार लोखंडी खंजीर आढळून आले. दोघांवरही शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
यासह २८ जून रोजी शहरातील समता नगर, अल्हाडा प्लॉट येथील रहिवाशी देवानंद नारायण वानखडे (२६) याच्या घरातून धारदार लोखंडी खंजीर जप्त करण्यात आले. तसेच २९ जून रोजी गस्तीदरम्यान हिंगोली नाका परिसरात राधेश्याम चंदू देशकर (३९, रा.शुक्रवार पेठ, मन्नासिंग चौक) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली. संबंधितावर गुन्हा नोंदविण्यात आला. कारवाईत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते, पोनि गजानन धंदर, पोउपनि सचिन गोखले, महादेव भिमटे, उमेश चव्हाण, संदीप दुतोंडे यांनी सहभाग नोंदविला.