- सुनील काकडेवाशिम : देशभरातील विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक प्रक्रियेत ‘ईव्हीएम मशीन’बाबत बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने अधिक दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून, ‘बॅलेट युनिट’, ‘कंट्रोल युनिट’ आणि ‘व्हीव्हीपॅट’, अशा तीन प्रकारच्या मशीन हैदराबादवरून पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुषंगाने २६ जुलै रोजी सदर ‘मशीन’ आणण्याकरिता वाशिममधून विशेष वाहने हैद्राबादकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.सन २०१४ मध्ये ७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत ५४३ पदांसाठी लोकसभा निवडणूक घेण्यात आली. त्यानुषंगाने आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल २०१९ मध्ये होण्याची शक्यता असून त्याची पुर्वतयारी निवडणूक आयोग तद्वतच जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. या निवडणूकीला सामोरे जाताना कुठल्याही तांत्रिक त्रुट्या राहू नये, याची विशेष खबरदारी घेतली जात असून ‘बॅलेट युनिट’, ‘कंट्रोल युनिट’ आणि ‘व्हीव्हीपॅट’, अशा तीन प्रकारच्या मशीन हैद्राबादवरून बोलाविण्यात येत आहेत. सदर मशीन प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेतील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देवून निवडणूक प्रक्रियेसाठी परिपूर्ण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त स्तरावर बैठक!आगामी लोकसभा निवडणूकीला साधारणत: १० महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी त्याची पुर्वतयारी जोरासोरात सुरू झाली आहे. त्यानुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यमान सर्व पदाधिकारी व अधिकारी, कर्मचाºयांच्या उपस्थितीत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात मतदान यंत्रांसह तत्सम बाबींवर उहापोह केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हैदराबादवरून ‘बॅलेट युनिट’, ‘कंट्रोल युनिट’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ अशा तीन प्रकारच्या मशीन आणण्याकरिता वाहने रवाना करण्यात आली आहेत. वाशिम जिल्ह्यात १०४० मतदान केंद्र असून आवश्यक प्रमाणात मशीन मागविण्यात आल्या आहेत.- शैलेष हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम