वाशिम: शस्त्र घेऊन रेल्वे स्टेशन परिसरात तीन युवक संशयास्पदरीत्या हालचाली करताना आढळून आले. या तिघांना वाशिम शहर पोलिसांनी हत्यारासह जेरबंद केल्याची घटना गुरुवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. वाशिम येथील रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळय़ा मैदानात तीन इसम मोटारसायकलवर क्र. एम.एच. ३७ के. ३६९१ ने हत्यार (खंजीर) घेऊन फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून ठाणेदार रवींद्र देशमुख यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव, उमांकात केदारे, सतीश गुळदे, अमोल गिर्हे, गजानन कर्हाळे यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले. या पथकाने संशयास्पद तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन खंजीर मिळून आले. यामध्ये सचिन दिलीप रसाळ (वय १८, रा. भीमनगर ) याच्या कमरेला एक खंजीर, संग्रपाल भारत कांबळे (वय १७ वर्ष रा. भीमनगर वाशिम ) याच्या कमरेला एक खंजीर, रंजीत सीताराम खरात (वय ३१ वर्ष) रा. भीमनगर वाशिम) याच्याकडे एक मोटारसायकल आढळून आली. असा अंदाजे एकूण २१ हजार २00 रुपयांचा मुद्देमाल तिघांकडून जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. वाशिम जिल्हय़ात रमजान सणानिमित्त कलम ३७ (१) १३५ प्रमाणे जिल्हाधिकार्यांनी आदेश केला आहे. प्रतिबंधक असलेला आदेश लागू असल्याने उपरोक्त आरोपींचे कृत्य कलम ४, २५ भा.ह.का.सह ३७ (१) १३५ मु.पो. अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव करीत आहेत.
हत्यार बाळगणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: June 17, 2016 2:29 AM