शेलूबाजार: भारतीय संस्कृतीत आजही मुलगा हाच वंशाचा दिवा मानून मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातो. या वृत्तीला तडा देणारी अनेक उदाहरणे आहेत. असेच एक उदाहरण मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथे पाहायला मिळते. तऱ्हाळा येथील नारायण वाघमारे यांच्या तीन मुलींनी माता - पित्याकडून मिळालेले संस्कार आणि शिक्षण घेऊन पोलीस सेवेत दाखल होत त्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.
तऱ्हाळा येथील नारायण प्रल्हादराव वाघमारे हे शेतमजूर आहेत. घरात आधीच गरिबी असताना त्यांच्या घरात तीन मुलींनी जन्म घेतला. प्रिया (२४), भाग्यश्री (२२) आणि श्रद्धा (२०) अशी त्यांची नावे. नारायण वाघमारे यांनी कधीही मुलींचा अव्हेर केला नाही. त्यांच्यावर राग काढला नाही किंवा घरच्या परिस्थितीमुळे त्यांचा कामासाठी आधारही घेतला नाही. नारायण वाघमारे आणि त्यांच्या पत्नीने अगदी लाड कौतुकाने या तिघींचा सांभाळ केला. त्यांच्यावर चांगले संस्कार घडविले, पोटाला चिमोरा देऊन त्यांना शिक्षण दिले. या तिघी बहिणींनीही माता - पित्याच्या संस्कारानुसार वागत शिक्षण घेतले. तिघींचे प्राथमिक शिक्षण तऱ्हाळा येथे, माध्यमिक शिक्षण शेलुबाजार येथे, तर उच्च शिक्षण मंगरुळपीर येथे तालुक्याच्या ठिकाणी झाले. शिक्षणासोबतच नोकरीची जिद्द मनात ठेवून त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यात २०१३ या पोलीस भरतीत प्रिया शिपाई पदासाठी पात्र ठरली. थोरल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत भाग्यश्री आणि श्रद्धानेही पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि २०१८ च्या पोलीस भरतीत या दोघींचीही शिपाई पदासाठी निवड झाली. सद्यस्थितीत प्रिया ही मंगरुळपीर उपविभागांतर्गत आसेगाव पोलीस स्थानकामध्ये, तर भाग्यश्री आणि श्रद्धा या दोघी अकोला येथे कर्तव्य बजावत आहेत.
-------------- तिघीनीही घेतले पदवीपर्यंतचे शिक्षण
नारायण वाघमारे यांच्या मुली प्रिया, भाग्यश्री आणि श्रद्धा यांनी केवळ नोकरीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच शिक्षण घेतले नाही. प्रत्यक्षात शिक्षणाचाही एक दर्जा असावा. समाजात वावरताना अभिमानाने सांगता यावे, तसेच ज्ञानात भर पडावी म्हणून त्या तिघींनीही पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
-----
कोट: सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी दाखविलेल्या मार्गानुसारच मी तिन्ही मुलींवर चांगले संस्कार घडवून त्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण केली. त्यांनीही माझ्या भावनांचा मान राखत जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घेतले. त्यात त्यांना यश आले. माझ्या तिन्ही मुलींचा मला सार्थ अभिमान आहे.
- नारायण वाघमारे (वडील),
तऱ्हाळा, ता. मंगरुळपीर