वाशिम: जिल्ह्यातील मानोरामधील इंझोरी गावात सध्या तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काम जोरात सुरू आहे. या कामात आबालवृद्धांनी उत्साहात सहभाग घेतला. विशेष म्हणजे तीन वर्षांच्या चिमुरड्यानंही या कामात खारीचा वाटा उचलला आहे. गावातील इतर लोकांसोबत हा चिमुकलाही पुनरुज्जीवनाच्या कामाला हातभार लावतो आहे. इंझोरीतील तलावाचं पुनरुज्जीवन झपाट्यानं होत आहे. ग्रामचेतना मंडळाच्या संकल्पनेतून गावाची पाणीटंचाई मिटविण्यासाठी सुरू असलेल्या या कामात गावकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह शिक्षक, विद्यार्थ्याही योगदान देत आहेत. त्यांचं अनुकरण करून ८ ते १० वर्षीय वयोगटातील मुलांनी सुट्टीचा आनंद घ्यायचा सोडून श्रमदान सुरू केलं आहे. त्यांना पाहून ३ वर्षीय चिमुकलाही श्रमदानात सहभागी झाला आहे. फजल खान असं या मुलाचं नाव आहे. फजल खानला घमेलं उचलत येत नाही. त्याला कुदळ, फावडं धरतानाही येत नाही. मात्र तरीही त्याचं श्रमदान थांबलेलं नाही. तलावाच्या खोदकामातील माती पाणी पिण्याच्या पेल्यात भरून ती काठावर नेऊन टाकण्याचं काम करतो आहे. पुनरुज्जीवनाच्या कामात स्वत:चं योगदान देणाऱ्या फजलचं अनेकांना कौतुक वाटतंय. त्याचा हा उत्साह पाहून अनेकांना प्रेरणादेखील मिळतेय.