कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान एसटीची प्रवासी वाहतूक काही महिने बंद होती. सुरू करण्यात आली त्यावेळीही अनेक निर्बंध होते. त्यात एसटीच्या रातराण्या बंदच होत्या. मंगरूळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड या चारपैकी एकाही आगारातून एसटीची रातराणी सोडण्यात येत नव्हती. आता निर्बंध शिथिल करण्यात आले असून, रात्री ८ वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विविध कामांनिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आणि जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आला आहे. आरोग्य विभागाच्या १२ ऑगस्टच्या अहवालानुसार केवळ १२ रुग्ण उपचाराखाली होते. असे असले तरी एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळेनासा झाला असून, रातराणी बसफेऱ्या जवळपास रिकाम्याच धावत आहेत. वाशिम- सिल्लोड आणि रिसोड आगाराच्या एका बसफेरीत जेमतेम चार ते पाच प्रवासीच प्रवास करीत असल्याचे चित्र मागील तीन दिवसांत पाहायला मिळाले.
-----
खासगी ट्रॅव्हल्स हाऊसफुल
जिल्ह्यात एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसून, दिवसाच्या वेळेतही अनेक बसगाड्या अर्ध्यावर रिकाम्याच धावत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. त्यात एसटीच्या रातराणी बसफेऱ्या, तर चक्क रिकाम्याच धावतात. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसगाड्यांत मात्र सीट मिळणेही कठीण असल्याचे बुकिंगच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांकडे प्रवास करणारे अनेक प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचाच आधार घेत आहेत.
------
कोट:
वाशिम आगारातून एक रातराणी फेरी गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. या फेरीला अपेक्षित असा प्रतिसाद लाभत नसला तरी प्रवाशांची संख्या वाढत आहे. आणखी काही दिवसांनी या बसफेरीतील प्रवाशांची संख्या वाढण्याचा विश्वास आहे.
-विनोद इलामे,
आगार व्यवस्थापक, वाशिम
----------