वाशिम : आधी काेराेनामुळे आणि आता काही भागात झालेल्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांवर संकट काेसळले. काही भागात जाेरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. पहिल्या पेरणीच्यावेळी उसनेपासने पैसे आणून, स्वत:जवळील पैसा खर्च करून कशीबशी पेरणी केली. परंतु पावसाने घात केला व दुबार पेरणीची वेळ आली. या संकटसमयी ‘दत्ता’ नामक युवा शेतकरी दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांसमाेर देवदूत म्हणून आला व स्वत:चे ट्रॅक्टर पूर्णपणे माेफत पेरणीसाठी देण्याचे ठरविले. ‘ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं’ हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी संकटात दिलासा देणारा ठरत आहे.
वाशिम तालुक्यातील नागठाणा परिसरात काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसामध्ये पेरणी केली. काही शेतामध्ये अतिपावसामुळे तर काही ठिकाणी बाेगस बियाण्यामुळे पेरलेल्या बीजाचे नुकसान झाले. तसेच शेती मशागतीचा खर्च ही व्यर्थ गेला. दुबार पेरणी कशी करावी, अशा संकटात शेतकरी हाेता. अशात दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, याकरिता गावातील दत्ता बयस या ३० वर्षीय युवा शेतकऱ्यासह ट्रॅक्टर चालकाने अभिनव उपक्रम सुरू केला. शेतकऱ्यांवरचा आर्थिक ताण कमी व्हावा म्हणून ‘ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं’ या संकल्पनेतून गावातील तीन दिवसात जवळपास ५० एकर शेतीची पेरणी केली . तसेच इतरही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची मागणी केली असून, आळीपाळीने पेरणी करण्यात येत आहे.
.............
दत्ता शेतकरी मित्र म्हणून प्रसिध्द
संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमीच धावून जात असलेला दत्ता शेतकरी मित्र म्हणून परिसरात प्रसिध्द आहे. तसेच त्याने तयार केलेला ‘शेतकरी मित्र’ व्हाॅट्सॲप ग्रुपसुध्दा आहे. याव्दारेही ताे शेतकऱ्यांना वेळाेवळी मार्गदर्शन करताेय.
दत्ताजवळ असलेला ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर
दत्ता बयस यांच्याकडे असलेला ट्रॅक्टर महिला आर्थिक विकास महामंडळाकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आला आहे. वार्षिक भाडे १ लाख १० हजार आहे. भाडे तत्त्वावर असलेले ट्रॅक्टर शेतकऱ्यांना पेरणीसाठी काेणताही माेबदला न घेता देऊन संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.
संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दत्ताची मदत ठरली माेलाची
वाढते बी-बियाणे, खताचे दर आणि पेरणीला एकरी ७०० रुपये खर्च येत असल्याने दत्ताने गावच्या माणसाना केलेली मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठी मोलाची ठरली. डिझेल टाकून कितीही एकर शेती पेरा असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. दत्ताने सुरू केलेल्या या उपक्रमाची माहिती परिसरातील गावातील लाेकांना कळाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या उपक्रमाचे काैतुक केले.
.............
परिसरात काही शेतकऱ्यांवर काेसळलेल्या संकटामुळे त्यांना मदतीचा हात मिळावा म्हणून माझ्याकडे असलेला ट्रॅक्टर माेफत देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना संकटसमयी मिळालेल्या मदतीमुळे त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत.
- दत्ता बयस,
कृषिमित्र तथा शेतकरी, नागठाणा