वाशिम : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध निर्बंधांबाबतचा संदेश व्हायरल होत आहे; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलेही नवे निर्देश जारी केले नसून त्यांच्या नावाने फिरणारा संदेश खोटा असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने स्पष्ट केले आहे. वृत्तपत्र वापरापासून काहीही धोका नसून अशा चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा संदर्भ देऊन ‘व्हॉट्सॲप' वर लवकरच कोरोना तिसऱ्या स्टेजला पोहोचणार असून, सर्वांनी अतिदक्षता पाळण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना, असा संदेश फिरत असून, सदर संदेश जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसारित करण्यात आल्याचे नमूद आहे. असा कुठलाही संदेश जिल्हा माहिती कार्यालय, वाशिममार्फत प्रसारित करण्यात आलेला नाही, असे जिल्हा माहिती कार्यालयाने स्पष्ट केले आहे. या संदेशानुसार कुणीही बेकरी सामान, ब्रेड, पाव घेऊ नये, वृत्तपत्रे दुसऱ्या दिवशी वाचावीत, १५ दिवसांची भाजी-धान्य घरी भरून ठेवावे, ऑनलाइन फूड डिलिव्हरी पूर्णत: बंद करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, असे कुठलेही निर्देश जारी झालेले नसून हा गैरसमज व भीती पसरविण्याचा प्रकार आहे. अशा प्रकारचे कोणतेही संदेश जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही. वाशिम जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना अधिकृतपणे जिल्हा माहिती कार्यालय विविध प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांतून प्रसारित करते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या संदेशाचा जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंध नाही, असे जिल्हा माहिती कार्यालयाने स्पष्ट केले.