शिखरचंद बागरेचा वाशिम : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची स्मृती जपणारे वाशिम शहरातील टिळक स्मारक भवन अर्थात रमेश चित्रपटगृह हे आता सांस्कृतिक, धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी शहरवासीयांना मोफत उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती रमेशचंद्र भवरीलाल लढ्ढा यांनी सोमवारी ह्यलोकमतह्णला दिली.स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटविण्याकरिता लोकमान्य टिळकांनी देशभरात समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले. ८ फेब्रुवारी १९१८ रोजी यानिमित्त त्यांचे वाशिम नगरीत आगमन झाले होते. सध्याच्या टिळक स्मारक भवनाच्या जवळून त्यावेळी लोकमान्य टिळकांची मिरवणूक काढण्यात आली होती. या जागेवर सन १९३० साली इमारत बांधकामास प्रारंभ होऊन २९ डिसेंबर १९३७ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले. त्यास लोकमान्य टिळक स्मारक भवन असे नाव देण्यात आले. सन १९३९ पासून या इमारतीत सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. लोकमान्य टिळकांची संकल्पना असलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची पंरपरा रुजू करण्यात आली होती. यादरम्यान ४ सप्टेंबर १९५२ पासून या इमारतीत भवरीलाल लढ्ढा यांनी रमेश चित्रपट गृहाची सुरुवात केली. तेव्हापासून सन २०११ पर्यंत चित्रपटगृह व दरवर्षी दहा दिवस गणेशोत्सवाची परंपरा कायम राहिली. मात्र, सन २०११ नंतर या इमारतीमधील रमेश चित्रपट गृह तसेच सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा खंडित झाली. तब्बल सात वर्षानंतर आता पुन्हा टिळक स्मारक भवन शहरवासीयांच्या सेवेत सांस्कृतिक कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रमासाठी खुले करण्यात येत असल्याची माहिती रमेश चित्रपटगृहाचे मालक रमेशचंद्र लढ्ढा यांनी दिली. यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून लढ्ढा व त्यांचे पुत्र रुपेश लढ्ढा यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम अथवा सामाजिक उपक्रम असो, त्यासाठी हे भवन मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. लोकमान्य टिळक स्मारक भवन पुन्हा एकवेळ वाशिमकरांच्या सेवेत सुरू करण्यास प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. असे असले तरी यापुढे टिळक स्मारक भवनात चित्रपटगृह सुरू होणार नसून, शहरातील सांस्कृतिक, धार्मिक अथवा कुठल्याही सामाजिक कार्यक्रमांसाठी ही इमारत मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल. - रमेशचंद्र लढ्ढा, वाशिम
टिळक स्मारक भवन सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले!
By admin | Published: May 11, 2017 6:48 AM