वाशिम - वाशिममार्गे धावणारी अमरावती- तिरुपती आणि काचीगुडा इंटरसिटी अशा दोन एक्सप्रेस गुरूवार, ३ नोव्हेंबर रोजी तब्बल अडीच तासाने वाशिम रेल्वे स्थानकावर उशिराने आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
कोरोनानंतर आता पूर्ण क्षमतेने रेल्वे धावत आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेता वाशिममार्गे पॅसेंजर तसेच एक्सप्रेसही धावत आहेत. रेल्वे सेवा सूरळीत असून, प्रवाशी संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. वाशिम स्थानकावर अमरावती- तिरुपती एक्सप्रेस सकाळी ९.१५ वाजता तर काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेस सकाळी १०.१५ वाजता येण्याची वेळ आहे.
३ नोव्हेंबर रोजी या दोन्ही एक्सप्रेस तब्बल अडीच तास विलंबाने धावल्या. अमरावती- तिरुपती एक्सप्रेस दुपारी १२.३० वाजता तर काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेस दुपारी १२.५२ वाजता वाशिम स्थानकावर आली. बडनेरा (जि.अमरावती) जवळ रेल्वेरूळाचे काही काम सुरू असल्याने एक्सप्रेसला उशिर झाल्याचे वाशिम येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रवीण पवार यांनी सांगितले.