वाशिम, दि. १९- १७ मार्च रोजी अपूर्ण राहिलेली जिल्हा परिषदेची सभा २0 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात शुक्रवार, १७ मार्च रोजी अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेत अर्थ समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सलग तिसर्यांदा जिल्हा परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, अन्य सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित करून अर्थसंकल्पाच्या मंजुरीला विरोध दर्शविला होता. वादळी चर्चेत सायंकाळपर्यंतही कामकाज संपत नसल्याचे पाहून, पीठासीन अधिकारी हर्षदा दिलीप देशमुख यांनी अपूर्ण सभा २0 मार्च रोजी पुन्हा घेण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला. त्यानुसार २0 मार्चला सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय सभा आणि दुपारी १ वाजतानंतर सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे.१७ मार्च रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सन २0१७-१८ या वर्षात विविध मार्गाने ४ कोटी ४0 लाख ४१ हजार ९३५ रुपयांचा महसूल येणार असून, ४ कोटी ३४ लाख ८२ हजार रुपये विविध विभागाच्या योजनांवर खर्च होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. हा अर्थसंकल्प शिलकीचा असून, उपलब्ध उत्पन्नानुसार विविध विभागांवर तरतूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, सोमवारच्या अर्थसंकल्पीय व सर्वसाधारण सभेत कोणत्या विषयावर वादळी चर्चा होणार, विरोधकांची भूमिका कोण बजावणार, विरोधकांचा आक्रमकपणा जागृत होईल का, आदी प्रश्नांकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. सत्ताधारीच बनले विरोधक!जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं व अपक्ष मिळून आघाडीची सत्ता आहे. विरोधी बाकावर शिवसेना-भाजपा असतानाही सभेत विरोधक हे विरोधकाची भूमिका बजावत नसल्याचे दिसून येते. सत्ताधारी सदस्यच विरोधकाची भूमिका बजावून सभागृह दणाणून सोडतात.
वाशिम जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा
By admin | Published: March 20, 2017 3:03 AM