लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थींना शौचालय बांधकामाचे अनुदान ३१ डिसेंबरपूर्वी वितरित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा स्वच्छता मिशनतर्फे ‘अंतिम तपासणी ओडीएफ टप्पा दोन’ची पडताळणी सुरू असून, यासाठी गावपातळीवर तीन जणांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ग्रामीण भागात शौचालय बांधकाम करणाºया लाभार्थींना ३१ डिसेंबरपूर्वी अनुदान वाटप करणे तसेच २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणात शौचालय नसणाºया कुटुंबांना प्रोत्साहन अनुदान वाटप करण्याची अंतिम मुदत शासनाने निश्चित केली असून, तसा कार्यक्रम राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केलेला आहे. पायाभूत सर्वेक्षणात असलेल्या तसेच पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या लाभार्थींनादेखील शौचालय बांधकाम केले असल्यास नियमानुसार प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या अनुदानापासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये तसेच अनुदानाचा लाभ दुबार मिळू नये यासाठी जिल्हा स्वच्छता मिशनतर्फे पडताळणी केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्हा स्वच्छता मिशन कक्षाला योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत. ३१ डिसेंबरनंतर शौचालय बांधकामाचे अनुदान मिळणार नसल्याने, जिल्ह्यातील लाभार्थींची पडताळणी केली जात आहे. अनुदानातून काही कुटुंबे सुटले असतील तर आता अंतिम तपासणी ओडीएफ टप्पा २ पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी त्या, त्या गावात समित्या स्थापन केल्या असून, त्यामध्ये गावातील किमान ३ जणांचा समावेश आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रत्येकी १००० रुपणे मानधन दिले जाणार आहे. पडताळणीच्या या कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.
३१ डिसेंबरपर्यंतच मिळणार शौचालय बांधकामाचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 4:53 PM