मिरज : आषाढी वारीसाठी मिरजेतून शेकडो दिंड्या पंढरपूरला जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा, सागाव येथील दिंडीत वारकऱ्यांच्या सोयीसाठी फिरत्या शौचालयाचा समावेश करण्यात आला आहे. ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’ असा संदेश देत मार्गक्रमण करणाऱ्या या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कसबा सागाव येथील श्री संप्रदायक आषाढी वारी सोहळ्याची दिंडी दरवर्षी पंढरपूरला जाते. वारीत गेले तीन वर्षे सहभागी होणारे तानाजी आप्पासाहेब माळी यांनी वारीत महिलांची शैचालयाची अडचण पाहून फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्याचे ठरविले. गावात बॅटरी दुरूस्ती व सौरऊर्जा उपकरणांची विक्री करणाऱ्या तानाजी माळी यांनी चार लाखांचा टाटा टेम्पो खरेदी करून त्यात दोन शौचालयांची निर्मिती केली. टेम्पोतील शौचालयावर पाण्याची टाकी व शौचालयाखाली मैला साठविण्यासाठी स्वतंत्र टाकी बसविण्यात आली आहे. शौचालयाचे दार उघडताच पाण्याने आपोआपच शौचकुपाची स्वच्छता होते. पुरुष व स्त्रियांसाठी दोन शौचालये आहेत. फिरते शौचालय सोबत असल्याने वारीतून जाताना कोठेही उघड्यावर घाण करण्यात येत नाही. यंदा वारीत दीडशे वारकरी सहभागी आहेत. यापैकी साठ महिला वारकरी आहेत. फिरत्या शौचालयामुळे त्यांची चांगली सोय झाली आहे. शौचालयाच्या टाकीतील मैला गावापासून दूर शेतात टाकण्यात येतो. पंढरपुरात वास्तव्यादरम्यानही वारकऱ्यांना शौचालयाचा उपयोग होणार असून, हा प्रयोग सर्व दिंड्यातून झाल्यास पंढरपूर स्वच्छ राहण्यास मदत होणार असल्याचे तानाजी माळी यांनी सांगितले. ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’चा संदेश देत कसबा कागलच्या वारकऱ्यांची दिंडी सोमवारी मिरजेतून पंढरपूरकडे रवाना झाली. (वार्ताहर)
वारकऱ्यांच्या दिंडीत फिरते शौचालय
By admin | Published: July 21, 2015 12:49 AM