वाशिम : तालुक्यातील तोंडगावजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील टोल प्लाझाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच कोसळले असून याप्रकरणी संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने २० ऑक्टोबर रोजी वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष गजानन वैरागडे व मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांच्या नेतृत्वात टोलबंद आंदोलन राबविण्यात आले.
यादरम्यान जवळपास ३ तास टोलवसुली बंद ठेवण्यात आली होती. या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष रवी वानखडे, फकिरा करडिले, मनसे सैनिक दिलीप कव्हर, बाळू विभुते, उमेश टोलमारे, जतीन सोनवणे, नागशे इंगळे, देवीदास जैताडे आदींनी सहभाग घेतला. या आंदोलनाची दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई न केल्यास पुढील काळात टोलफोडो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय समृद्धी महामार्ग अधिकारी लठाड यांना निवेदन देण्यात आले