वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. २५ टक्के कोट्यातील जागा रिक्त असल्याने या जागेसाठी संबंधित शाळेत आॅनलाईन अर्ज केल्यानंतर, अर्ज पात्र ठरल्यास प्रवेश मिळणार आहे. ११ जुलैपर्यंत आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. शिक्षण हक्क कायद्याने दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी यापूर्वी फेब्रुवारी व मार्च महिन्यात आॅनलाईन प्रक्रिया राबविली होती. तथापि, काही जागा रिक्त असल्याने आता ११ जुलैपर्यंत संबंधित शाळेत पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांना आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. कोणत्या शाळेत किती जागा रिक्त आहेत, याचा लेखाजोखा तयार असून, संबंधित शाळेत पालकांनी आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले.
२५ टक्के मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची उद्या अंतिम मुदत
By admin | Published: July 09, 2017 1:59 PM