शेतकरी उत्साहित: बाजारांत आवक वाढलीलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राष्ट्रीयस्तरावर मागणी वाढल्याने सोयाबीननंतर तुरीलाही बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहेत. वाशिम जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी तुरीचे दर ५७०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. तुरीला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी उत्साहीत असून, बाजार समित्यांत या शेतमालाची आवकही वाढत असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा ५९ हजार ७८० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. सुरुवातीच्या चांगल्या पावसानंतर या पिकाची स्थिती सुधारली; परंतु आॅगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसासह धुक्यामुळे या पिकाला फटका बसला आणि उत्पादनात काही अंशी घट आली. त्यातच नवी तूर बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर या शेतमालाचे दर प्रचंड कोसळले. शासनाने तुरीला ५६७५ रुपये प्रति क्विंटल दर घोषीत केले असताना जिल्ह्यात अवघ्या ४५०० ते ४६०० रुपये क्विंटलने या शेतमालाची खरेदी करण्यात येत होती. आधीच उत्पादनात घट आल्यानंतर शेतमालास अपेक्षीत दरही मिळत नसल्याने तूर उत्पादकांत निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी बाजार समित्यांमधील तुरीची आवकही मोठ्या प्रमाणात घटली होती. तथापि, या आठवड्यात तुरीच्या दरात सतत वाढ होत गेली आणि शनिवारी या शेतमालाची खरेदी तब्बल ५७०० रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्यात आली. अर्थात शासनाच्या हमीभावापेक्षा व्यापाºयांकडून तुरीला २५ रुपये प्रति क्विंटल अधिक दर मिळत असल्याने शेतकरी उत्साहीत आहेत. या आठवड्यात तुरीच्या दरात सतत वाढ होत असताना आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
बाजारांत तुरीला हमीभावापेक्षा अधिक दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 3:01 PM