००००
एस.टी. प्रवाशांच्या संख्येत घट
वाशिम : मध्यंतरी खचाखच भरून धावणाऱ्या एस.टी. बसेसला आता मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रवासी मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक बसेस यामुळे बंद करण्याची वेळ ओढवलेली आहे.
०००
विद्युत खांबांवरील दिवे अद्याप बंदच
मालेगाव : राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर ठरावीक ठिकाणी उंच खांब उभे करून त्यावर विद्युत दिवे बसविण्यात आले; मात्र मालेगाव-हिंगोली मार्गावरील दिवे अद्याप सुरूच झालेले नाहीत.
०००
कंत्राटदारांची देयके रखडली
वाशिम : राज्य शासनाकडे गत अडीच वर्षांपासून कोट्यवधींची देयके प्रलंबित असून, याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी जिल्हा कंत्राटदार संघटनेने केली. शासनाच्या विविध विभागांतर्गत कामे केल्यानंतरही देयके वेळेवर मिळत नाही.
०००००
बँकांमध्ये नियमांचे पालन करण्याचा विसर
वाशिम : शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासह सॅनिटायझरची व्यवस्थाही नसल्याचे आढळून आले.
०००
पशुसंवर्धन विभागाचे कामकाज प्रभावित
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात वर्ग दोन दर्जाची आठ पदे रिक्त असल्याने कामकाजात खोळंबा निर्माण होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी पशुपालकांनी यापूर्वीही केली होती; परंतु अद्याप रिक्त पदे भरण्यात आली नाहीत.
००००
कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन
वाशिम : नागरिकांनी कुठलाही धोका न पत्करता शासनाने घालून दिलेले कोरोनाविषयक नियम पाळावे. पोलिसांवर ताण येईल, अशी कृती करू नये, असे आवाहन ठाणेदार धृवास बावनकर यांनी केले आहे.
०००
क्षयरुग्णांची नोंदणी करण्याची गती मंदावली
वाशिम : खासगी रुग्णालये, खासगी औषधी विक्रेते, प्रयोगशाळा यासारख्या संस्थांनी क्षयरुग्णांची विहित नमुन्यातील माहिती व नोंदणी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाकडे करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याची गती मंदावली असून, प्रत्येकाने क्षयरुग्णांची माहिती सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
००००
उड्डाणपुलाचे काम संथ गतीने
वाशिम : वाशिम-पुसद रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला. असे असताना संथ गतीमुळे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.
०००
ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रश्न प्रलंबित
वाशिम : स्थानिक नगर परिषदेकडून दैनंदिन शहरात घंटागाडी फिरवून सुका व ओला कचरा संकलित केला जातो; मात्र ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.
०००
अंगणवाडीतील आधार नोंदणी ठप्प
वाशिम : अंगणवाडीतील बालकांची आधार नोंदणी कोरोनामुळे ठप्प पडली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आधार नोंदणी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
०००
नियमाचे उल्लंघन; चालकावर कारवाई
वाशिम : वाशिम-रिसोड मार्गावरील वांगी फाटा, मोहजा रोड आदी परिसरात वाहतुक नियम मोडणाऱ्या चालकांवर वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. यापुढेही कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे.
०००
सहकार क्षेत्रातील निवडणूक लांबणीवर
वाशिम : जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सहकार क्षेत्रातील शिक्षक पतसंस्था व अन्य पतसंस्थांची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही.
०००
आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
वाशिम : वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डावरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, आरोग्यविषयक सेवा आदींबाबत त्यांनी सूचना केल्या.
००००