ऑनलाइन लोकमत
वाशिम : राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजने उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाला आटापिटा करावा लागत आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत जिल्ह्यात १९०० शेतकळ्यांचे उद्दिष्ट असताना अद्याप दीडशे शेततळीही पूर्ण होऊ शकली नाहीत.
दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांना पावसाअभावी नुकसान सहन करावे लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अस्तित्वात आणली; परंतु या योजनेतील जाचक व किचकट अटींमुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी योजनेकडे बहुतांशी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात या योजनेची एप्रिल २०१६ या महिण्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. याअंतर्गत कृषी विभागाला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र, जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यापर्र्यंत जिल्ह्यात केवळ १२४ शेत तळी पूर्ण होऊ शकली आहेत. योजनेतील तोकड्या अनुदानामुळे, तसेच शेततळे घेतल्यानंतरही त्याचा फायदा होण्याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास तयार नाहीत. कृषी विभागाकडे या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज आले असले तरी, प्रत्यक्षात कृषी विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान बहुतांश शेतकरी या योजनेबाबत उत्सूक नसल्याचे दिसून आले. शेततळ्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असते, त्यातच शासनाकडून केवळ ५० हजार रुपये अनुदान मिळते. हे अनुदान शेततळ्याचे खोदकाम केल्यानंतर देण्यात येते. तत्पूर्वी शेतकºयाला स्वत: खर्च करून शेततळे खोदावे लागते. ज्या जागेवर शेततळे खोदण्यास सुरुवात झाली, त्या जागेवर लवकर खडक लागल्यास शेततळ्यासाठी लागणारा खर्च वाढतो आणि तो खर्च शेतक ºयांना स्वत: भरावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकरी शेततळे घेण्याच्या विचारातच नाहीत. डिसेंबर महिन्यात प्रशासनाने या योजनेला गती देवून ८६ शेततळ्यांची कामे पूर्ण करून घेतली आहेत. तथापि, उर्वरित तीन महिन्यांत १,७७६ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्याचे कडवे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार असल्याने या योजनेची उद्दिष्ट पूर्ती होणे अशक्यच वाटत आहे.