लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य सरकारने लागू केलेल्या ‘ब्रेक दी चेन’च्या नियमावलीबाबत जिल्हाभरातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, आज पहिल्या दिवशी सकाळी नित्यनेमानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली; मात्र काहीच वेळात पोलीस प्रशासन, न.प., ग्रा.पं.च्या पथकाने येऊन दुकाने बंद करायला लावली. यामुळे व्यापाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त झाला.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत सध्या हा आकडा १७ हजारांपेक्षा अधिक झाला आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे १ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत ३४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाची ही साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुषंगाने ५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत जिल्हाभरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व स्वरूपातील दुकाने, प्रतिष्ठाने, आस`थापना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आठवड्यातील प्रत्येक सोमवारपासून शुक्रवारपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरता येणार नाही किंवा एकत्र जमता येणार नाही. अत्यावश्यक सेवा सकाळी ७ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतीलत्यात अन्नधान्याची दुकाने, भाजीपाला, फळविक्री, दूध डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने, रेल्वे, टॅक्सी, आॅटो आणि बसेस सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. माल वाहतूक, शेतीसंबंधीच्या सेवा, अधिकृत मिडीया, पेट्रोलपंप, शासकीय व खाजगी सेक्युरिटी सर्व्हीस सुरू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आदेशात नमूद केले आहे.
गतवर्षी अनेक दिवस दुकाने बंद राहिल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले; मात्र प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी कोरोना चाचण्या करून घेतल्या. असे असताना चेन दी ब्रेकच्या नावाखाली लाॅकडाऊन लावून व्यापाऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे. व्यापाऱ्यांची मानसिकता नसल्याने प्रशासनाने फेरविचार करायला हवा.- आनंद चरखा, अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम