रिसोड तालुक्यात मुख्य बाजारपेठेत तसेच ग्रामीण भागातील मोठ्या मोठ्या गावातील अनेक व्यावसायिक आपापले व्यवसाय थाटून बसलेले आहे. हे व्यवसाय उभे करताना अनेकांनी बँकांचे कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून कोरोनामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांनी पुन्हा व्यवसायास सुरुवात केली. गाडी पुन्हा रुळावर येत असताना दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागली. त्यामुळे राज्य शासनाने ब्रेक द चेन अभियान सुरू केले. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतांश व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवल्यामुळे बँकेचे हप्ते वेळेवर भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे बँका व खाजगी पतसंस्थेचा हप्ता भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे तगादा सुरू झाला आहे. ठरवून दिलेल्या वेळेत बँकेचे हप्ते भरले गेले नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे सिबिल स्कोअर खराब होताना दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा कर्जासाठी बँक दारात उभे करणार नसल्याने व्यवसाय पुन्हा सुरळीत कसा आणायचा, याचा प्रश्न व्यापाऱ्यांना पडू लागला आहे. या ‘ब्रेक द चेन’ निर्णयाचा व्यापारी संघटनांकडून विरोध होत आहे. गेले संपूर्ण वर्ष असेच गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. छोटे व्यावसायिक आणखी संकटात सापडले आहेत. दुकानात माल पडून असून व्यापाऱ्यांचे देणे थकले आहे. अनेकांना घरप्रपंच चालविणेही कठीण झाले आहे.
पुन्हा कर्ज न भेटण्याची व्यापाऱ्यांना भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:29 AM