रिसोड : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल अमृता आरू हे व्यापा-यासंदर्भात चुकीच्या तक्रारी करीत मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करीत गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी व्यापारी एकवटले आहेत. यासंदर्भात रिसोड पोलीस स्टेशनला ३१ जुलै रोजी तक्रारही देण्यात आली.
पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाल्याने याठिकाणी प्रशासकाची निवड करण्यात आली. विठ्ठल आरू हे संचालक असताना, बाजार समितीत होत असलेल्या सभेमध्ये सर्व ठरावावर सहमती दर्शवून स्वाक्षरी करीत होते व सभा संपल्यानंतर लगेच यासंदर्भात तक्रारी करण्यास सुरुवात करत होते. त्यांनी आतापर्यंत बाजार समितीच्या संदर्भात ५० ते ६० तक्रारी केल्या असून त्या तक्रारीत काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे वरिष्ठांनी त्यांच्या तक्रारी फेटाळून लावल्या आहेत. काही प्रकरणात तर त्यांनी कोणतीही अडचण नाही, असे लेटरपॅड लिहून देत तक्रार मागे घेतल्याने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, असे व्यापा-यांनी तक्रारीत म्हटले आहे. कोरोना संसर्गामुळे व्यापाऱ्यांची दुकाने गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे बेजार असताना, आरू हे तक्रारी करून मानसिक त्रास देत आहेत, असा आरोप करीत आरू यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी रिसोड पोलीस निरीक्षकांकडे व्यापा-यांनी केली. निवेदनावर प्रकाशराव वायभासे, नारायणराव वामनराव सानप, राजू प्रल्हाद राऊत, भारत कोंडोजी कोकाटे, दिलीप जिरवणकर, सुभाष बळी, राजेश खडसे, देवेंद्र जोगी यांच्या स्वाक्ष-या आहेत.
....
कोट
बाजार समितीतील चुकीच्या पद्धतीने मोजमाप करून दिलेल्या दुकानाची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालय वाशिम यांच्याकडे दिली आहे. या तक्रारीचा आणि व्यापा-यांचा कुठलाही संबंध नाही, हे माझ्याविरोधात कोणीतरी षडयंत्र रचत आहे. मी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरुद्ध तक्रारी केल्या आहेत.
- विठ्ठल आरू,
माजी संचालक, बाजार समिती रिसोड