नगरसेवक पवन छित्तरका हे डॉ. आंबेडकर चौक येथील स्वत:च्या भुसार दुकानात बसले असता मोमिनपुरा भागातील अक्रम खान मरदान खान (३२) हा मद्यधुंद अवस्थेत थेट दुकानात येऊन छित्तरका यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून फरार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत छित्तरका यांना येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता पुढील उपचाराकरिता वाशिम येथे हलविण्यात आले. पोलीस हे आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर संतापलेल्या व्यापारी वर्गाने १ सप्टेंबर रोजी ठाणेदार एस. एम. जाधव यांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन दिले. आरोपीला लवकरच पकडून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जाधव यांनी दिले. यावेळी शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व अन्य व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोपीवरील कारवाईसाठी व्यापारी धडकले पोलीस स्टेशनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:30 AM