शिरपूर जैन (वाशिम): गेल्या ५ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम असून, या अंतर्गत ३१ मार्च २०१९ रोजी २९ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. गवळी समाजाच्या या आदर्श उपक्रमांत यापूर्वी १२० जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. मागील काही वर्षांपासून लग्न सोहळ्यात झगमगाट, बँण्डबॉजा, खानावळी, आहेर आदिंवर खर्च करण्याच्या प्रथाच रुढ झाल्या आहेत. शिरपूर जैन येथील गवळी समाजाने मात्र अनाठायी खर्च होणाºया या प्रथांना फाटा देऊन सामुहिक विवाह सोहळ्याची आदर्श पद्धती अवलंबली आहे. गेल्या ५ वर्षांपासून या ठिकाणी गवळी समाजाच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यावर्षीही या सोहळ्यात ३१ मार्च रोजी २९ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. यातील २९ वधूंना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व गवळी समाजबांधवांनी परिश्रम घेत आहेत. या सामुहिक विवाह सोहळ्यात कारंजा, मेहकर, जालना, लोणार, वाशिम, अंबाजोगाई, सुरकुंडी आणि मंगरूळपीरसह राज्यभरातील विविध ठिकाणचे वर-वधू विवाह बंधनात अडकणार आहेत. या सोहळ्यात सहभागी जोडप्यांना दरवर्षीप्रमाणे संसारोपयोगी साहित्यही वाटप करण्यात येणार असून, वºहाडी म्हणून येणाºया पाहुण्यांसह आमंत्रित हजारो लोकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. गवळी समाजात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या समाजात लग्नावर अधिक खर्च करणे परवडणारे नाही. ही समस्या लक्षात घेऊन समाजबांधवांचा खर्च वाचविण्यासह एक आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने काही सुज्ञ बांधवांनी समाजापुढे सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला गवळी समाजाकडून प्रतिसाद मिळाला आणि एक आदर्श प्रथा या समाजात पडली आहे. गेल्या पाच वर्षांत या सामूहिक विवाह सोहळ्यांत १२० जोडपी विवाहबद्ध झाली असून, यात ३१ मार्च रोजी २९ जोडप्यांची भर पडणार आहे.
गवळी समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा अबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 4:19 PM