.................
रोजंदारी मजुरांची ज्येष्ठता सूची
वाशिम : जिल्ह्यातील सर्व फळ रोपवाटिका, तालुका बीज गुणन केंद्र येथील रोजंदारी मजुरांची अंतरिम ज्येष्ठता सूची जिल्हा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
...............
वाशिम येथे शिबिरात नेत्ररुग्णांची तपासणी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवार, २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या घेण्यात आलेल्या नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात पन्नासपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. यासह रुग्णांना औषधोपचारही देण्यात आला.
.................
शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी पाच वाजेनंतर दुकाने सुरू ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुषंगाने विशेष ‘वॉच’ ठेवला जात असून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून येत आहे.
.................
गाव विकास समिती कार्यालय सुरू
वाशिम : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या रिसोड येथील लोकसंचालित साधन केंद्राअंतर्गत येणाऱ्या सवड येथे बचतगटातील महिलांकरिता गाव विकास समिती कार्यालय सुरू करण्यात आले. महिलांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
..............
हरभरा काढणीस शेतकऱ्यांकडून वेग
मेडशी : यावर्षी असलेले पोषक वातावरण आणि सिंचनाकरिता मुबलक पाणी उपलब्ध असल्याने काही शेतकऱ्यांनी उशिराने हरभरा पिकाची पेरणी केली. हे पीक सध्या काढून घेण्याची प्रक्रिया सुरू असून त्यास वेग मिळाल्याचे दिसून येत आहे.
..............
कृती आराखडा तयार करण्याचे आवाहन
किन्हीराजा : गावठाण सर्वेक्षणाचे काम कोणत्याही अडचणीशिवाय तसेच कमी कालावधीत पूर्ण होण्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. त्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
...................
‘त्या’ रस्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित
वाशिम : शहरातील समतानगर, अल्लाडा प्लॉट परिसरात रस्तेच नाहीत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याप्रश्नी महिलांनी १२ फेब्रुवारीला न.प.कडे निवेदन सादर केले; मात्र प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
................
अल्पवयीन वाहनचालकांवर विशेष ‘वॉच’
वाशिम : अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याकडे शहर वाहतूक विभागाने विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केल्याची माहिती शहर वाहतूक निरीक्षक नागेश मोहोड यांनी दिली.
................
रिक्त पदे भरण्याची मागणी
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तुलनेने अपुरे मनुष्यबळ आहे. यामुळे कामकाज वारंवार प्रभावित होऊन नागरिकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेता रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी बंडू चव्हाण यांनी बुधवारी केली.
................
मजुरांनी माहिती सादर करावी
मालेगाव : मग्रारोहयोअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम केलेल्या मजुरांच्या आधार लिंक बँक खात्याची माहिती विनाविलंब सादर करावी, असे आवाहन पंचायत समितीकडून करण्यात आले आहे.
...............
सेंद्रिय शेतमाल विक्रीचा प्रश्न
जऊळका रेल्वे : परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढले आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला विक्रीसाठी कृषी विभागाने व्यवस्था निर्माण केली; मात्र कोरोनामुळे शहरी भागात विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
...............
वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई
वाशिम : येथून मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या अमानी महामार्ग पोलिस केंद्राकडे स्पीड गन व्हॅन उपलब्ध असून त्याव्दारे मंगळवार आणि बुधवारी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
................
‘ड्रेसकोड’चा नियम दुर्लक्षित
वाशिम : शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी ठराविक ड्रेसकोड वापरण्याचे शासनाचे निर्देश आहेत; मात्र त्याची चोख अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. हा नियम दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे.
.............
पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिक त्रस्त
वाशिम : जुने शहरातील शुक्रवारपेठ परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने विशेषत: महिला त्रस्त झाल्या आहेत.