पाणी फाउंडेशनकडून गत दोन वर्षांपूर्वी वॉटर कप स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची अधिकाधिक कामे करून गावे पाणीदार करण्यात आली. आता या स्पर्धेच्याच धर्तीवर शेतकरी व गावकऱ्यांच्या विकासातून गाव समृद्ध करण्यासाठी समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेंत जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. त्यात कारंजा तालुक्यातील २४ गावे आहेत. या गावांत शेतकरी व गावकऱ्यांच्या सहकार्यातून विविध कामे केली जात आहेत. यासाठी पाणी फाउंडेशनकडून प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यात शेतीचा जमाखर्च ठेवण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असून, यासाठी आवश्यक असलेल्या मोबाईल अॅपचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. कारंजा तालुक्यातील जानोरीत यासंदर्भात शुक्रवारी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
--
जानोरीवासीयांचा प्रतिसाद
शेतीचा जमाखर्च अॅपमध्ये कसा भरावा, यासाठी जानोरीत शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. मास्टर टेक्निकल ट्रेनर सुमित गोरले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अॅप विषयी सविस्तर माहिती दिली व सोयाबीन या पिकाची माहिती व जमाखर्च शेतकऱ्यांकडून भरून घेतला. गावातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद आज मिळाला. अॅपमध्ये शेतीचा जमाखर्च भरणे किती सोपा असून, तो भरल्यानंतर शेतीच्या जमाखर्चाचा सारांश पाहायला मिळतो तो चकित करणारा आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या.